पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५८७
खर्डा - अखेरचा विजय
 

ही दोन्ही राज्ये हिंदूंची आहेत. तुम्ही हिंदू आहांत. आम्ही हेच इच्छितो की हिंदूचे राज्य व्हावे आणि आमचे रक्षण व्हावे. त्यास तुम्ही आम्हांस राज्यभ्रष्ट करता हे ठीक नाही.' पण महादजीने हे मानले नाही व खंडणीसाठी सर्व जयपूर प्रदेश लुटून फस्त केला. यानंतर १७९० साली पुन्हा त्याने रजपुतांवर शस्त्र उगारले आणि पाटण व भेडता येथील लढायांत रजपुतांचा निःपात केला. चितोड, उदेपूर ही त्याने अशीच जिंकली. या सर्व प्रकरणांतून रजपूत हे मराठ्यांचे हाडवैरी झाले. दक्षिणी दिसला की ते त्याचे नाककान कापून हाकलून देत. एकदा तर महादजी फार आजारी असताना त्याला बरे वाटू नये म्हणून त्यांने ब्राह्मण अनुष्ठाने बसवली होती. इतके करून या सर्वांचे फलित काय ? यामुळे मराठ्यांचा उत्कर्ष साधला काय ? हिंदुपदपातशाही हे शिवछत्रपतींचे ध्येय. ते अणुमात्र तरी साध्य झाले काय ?

सर्व हिंदुस्थान विरुद्ध
 महादजी फार विवेकी, समंजस म्हणून सरदेसाई यांनी त्याचा गौरव केला आहे, तो अगदी खरा आहे. तुकोजी होळकर, फत्तेसिंग गायकवाड, भोसले, अलीबहाद्दर हे फितूर झाले, जागोजागी त्यांनी महादजीच्या वाटेत काटे पसरले. तरी, त्यावर विजय मिळविल्यावरही, महादजीने त्यांना सौम्यपणेच वागविले. हाच सौम्यपणा त्याने रजपूत, शीख व जाट यांशी दाखवून त्यांची उत्तरेत एक मोठी फळी उभारली असती, तर हिंदुपदपातशाहीचे ध्येय कितीतरी जवळ आले असते. पण ते धोरण न ठेवल्यामुळे झाले काय ? सर्व उत्तर हिंदुस्थान महादजी विरुद्ध उभा राहिला. स्वतः महादजीच्या अनेक पत्रांत असा उल्लेख आहे. एवढा मोठा विरोध सोसण्याचे, तो मारून काढण्याचे सामर्थ्य त्याच्या ठायी होते काय ? मराठ्यांच्या ठायी तरी होते काय ? टिपूवरची बदामीची स्वारी आटपल्यावर नानाने महादजीच्या मदतीसाठी मस्तानीचा नातू अलीबहादूर व तुकोजी होळकर यांना उत्तरेत पाठविले. महिना दीड महिन्यांत ते दिल्लीस पोचावयास हवे होते. पण ते रमतगमत गेले आणि सव्वा वर्षाने पोचले. आणि तेथे गेल्यावर महादजीच्याच विरुद्ध कारस्थाने करू लागले. स्वतः नानाचे मन महादजीविषयी शुद्ध होते असेही नाही. एकदा उत्तरेची जबाबदारी महादजीवर सोपविल्यावर ती सर्वस्वी त्याच्या ताब्यात त्याने द्यावयास हवी होती. पण तसे त्याने कधीच केले नाही. रजपूत राजांकडे त्याचे स्वतंत्र वकील असत. आणि तुकोजी व अलीबहाद्दर यांना तो अनेक वेळा महादजीविरुद्ध चिथावीत असे.

मुस्लिम नबाब
 महादजीने बादशहाला आश्रय दिला, त्याला पुन्हा स्थानापन्न केले, म्हणून मुसलमानांना आनंद झाला, असे कोणास वाटेल. पण घडले ते अगदी उलट. बादशहा सर्वस्वी महादजीच्या तंत्राने चालतो, हे एकाही मुसलमान सरदारास पसंत नव्हते. ते