पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
५८६
 

महादजी उभा राहिला; यामुळे रजपुतांशी मराठ्यांचे हाडवैर निर्माण झाले. कारण बादशहाच्या वतीने आणि मराठ्यांच्या वतीने अशी दुहेरी खंडणी महादजी मागू लागला !
 महादजी १७८० साली उत्तरेत गेला. आणि १७९२ साली दक्षिणेत परत आला. या दहाबारा वर्षातली पाचसहा वर्षे त्याची रजपुतांशी लढण्यातच गेली ! हिंदुपदपातशाहीच्या दृष्टीने हे अत्यंत विपरीत दिसते. या रजपूत प्रकरणाचा प्रारंभ झाला तो तर अगदी अश्लाघ्य कारणाने मराठा सरदारांना पैसा कधी पुरत नसे. पैशाची ओढ, कर्ज हे त्यांचे कायमचे लक्षण होऊन बसले होते. महादजी त्याला अपवाद नव्हता. १७८४ साली जयपूरचा राजा अल्पवयी होता. त्याचा चुलता प्रतापसिंह कारभार पाहात असे. यात आक्षेपार्ह काही नव्हते. आणि असले तरी महादजीला त्यात लक्ष चालण्याचे कराण नव्हते. पण अलवारचा राजा त्याचा दोस्त. त्याला जयपूरवर वर्चस्व हवे होते. म्हणून त्या अल्पवयी मुलाच्या बाजूने भला मोठा पैका त्याने महादजीला देऊ केला. आणि महादजी त्यात उतरला. सरदेसाई म्हणतात हे जयपूर प्रकरण महादजीने केवळ द्रव्यलोभाने हाती घेतले आणि तेच अंती त्याच्या अंगावर आले.

रजपूत
 यातच १७८६ साली राघवगड प्रकरण उपस्थित झाले. या भागास खेची वाडा म्हणतात. तेथे बलभद्रसिंग हा पृथ्वीराज चव्हाणांच्या वंशातला पुरुष राजा होता. हा बलभद्रसिंग एकदा इंग्रजांना मिळाला होता. म्हणून त्याचा पाडाव करण्याचे महादजीने ठरविले. आणि राघवगड किल्ला घेऊन राजास व राजपुत्रास कैदेत ठेवले. पण हे जुने घराणे. त्याचा हा अपमान ! त्यामुळे बाहेरचे रजपूत फार खवळले. त्यांचा बंडावा शमविण्यास महादजीस आपले सर्व सामर्थ्य एक वर्ष खर्ची बालावे लागले आणि प्राप्ती पैचीही झाली नाही.

लालसोट
 पुढे जयपूरच्या खंडणीचा प्रश्न निघाला. महादजीने त्यावर साडेतीन कोटीची बाकी काढली. शिवाय त्या गादीवर मूळचा अल्पवयी राजा मानसिंग यास बसविण्याचा प्रश्न होताच. जयपूरच्या वकिलाने कळविले की साडेतीन कोटी दगडसुद्धा आमच्याजवळ नाहीत. तेव्हा युद्ध अटळ झाले. या वेळी जोधपूरचा वीजेसिंग व इतर रजपूत एकदम उठले. आणि लालसोट येथे पानपतसारखा घनघोर संग्राम होऊन महादजीस पळ काढावा लागला आणि पैची प्राप्ती न होता खर्च मात्र सगळा अंगावर आला.

फल काय ?
 या वेळी रजपूत पुण्याला व महादजीला विनवीत होते की 'जयपूर व जोधपूर