पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
३३
अस्मितेचा उदय
 

नागभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. पाताळ, रसातळ, महीतळ हे सर्व कोकणच्या विभागांचेच उल्लेख आहेत, असे राजवाडे म्हणतात. चेमुलक (चौल ), कलियण ( कल्याण ) ही कोकणातील बंदरे प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहेत. येथून पाश्चात्य देशांशी मोठा व्यापार तेव्हा चालत असे. ग्रीक भूगोलज्ञ टॉलेमी याने अपरान्ताचा याचसाठी निर्देश केला आहे ( इ. पू. १५० ). पुढे पुराणात, नाशिकच्या शिलालेखात अपरान्त सूपारक यांचे उल्लेख वारंवार येतात.
 गोपराष्ट्र म्हणजे नाशिकचा परिसर होय. मल्लराष्ट्र हे त्याच्या दक्षिणेस होते. पांडुराष्ट्र हे प्रसिद्ध पांड्यराष्ट्र होय. याचाही अंतर्भाव त्या वेळी महाराष्ट्रात होत असावा असे कृ. पां. कुळकर्णी म्हणतात.

मरहट्ट- कानडी
 शं. वा. जोशी यांनी आपल्या 'मऱ्हाटी संस्कृती - काही समस्या' या पुस्तकात महाराष्ट्र हे देशनाव, मराठे लोक, त्यांची मऱ्हाटी भाषा याविषयी काही अभिनव मते मांडली आहेत. त्यांच्या मते महाराष्ट्र या देशाचे मूळ नाव मरहट्ट असे होते. ते नाव कानडी आहे. मर हा कानडी शब्द असून त्याचा अर्थ झाड असा आहे. हट्ट, हट्टी हे पत्ती या संस्कृत शब्दाचे कानडी रूप होय. हे दोन शब्द मिळून मरहट्ट शब्द झाला. वऱ्हाडात हटगार - धनगर या लोकांची वस्ती आहे. आणि मूळ महाराष्ट्र म्हणजे वऱ्हाडच होय. झाडीमंडळ असे वऱ्हाडचे एक दुसरे नाव पूर्वी रूढ होते. तेव्हा झाडीत राहाणारे हट्टी ते मरहट्टे लोक होत आणि त्यांच्यावरून त्यांच्या भाषेला नाव पडले हे स्पष्ट आहे. हे विवेचन करताना जोशी यांनी असा विचार वारंवार मांडला आहे की इ. सनाच्या बाराव्या शतकापर्यंत महाराष्ट्र या भूप्रदेशावर कानडी भाषेचे व कर्नाटकाचे सामाजिक व राजकीय वर्चस्व होते. त्या सुमारास मराठी भाषा कानडी- पासून वेगळी होऊ लागली. ज्ञानेश्वरीवर कानडीची दाट छाया आहे. यावरून हे अनुमान निश्चित होते. खानदेश हा कृष्णदेश म्हणजे कानडी देशच होय. वऱ्हाड ( वऱ्हाट ) याचेच ' व ' चा 'म' होण्याच्या कानडी प्रवृत्तीमुळे मऱ्हाट असे रूप झाले. राष्ट्रकूटाचे पूर्वज राष्ट्रिक - रिस्टिक हे होत. राष्ट्रिक याचा अर्थ देशाचा मूळ रहिवासी. हा राष्ट्रिक शब्द नाडव या कानडी शब्दाचे भाषांतर होय. त्र्यंबकेश्वरला हाटकेश्वर असेही एक नाव आहे. त्यातील हाटक म्हणजे हट्टी. त्यांचा ईश्वर तो हाटकेश्वर. भावार्थ असा की इ. सनाच्या बाराव्या शतकापर्यंत महाराष्ट्र हा कन्नड देशच होता.
 व्युत्पत्तीच्या आधाराने जोशी यांनी एक उत्कृष्ट भ्रमजाल निर्माण केले आहे यात शंका नाही. याबद्दल त्याचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे. त्यांच्या या विचार- सरणीचा आता परामर्श घेऊ.
 जोशी म्हणतात, जुन्या काही पंडितांनी महारथी, महारठी, राष्ट्रिक - महाराष्ट्रिक वगैरे क्लृप्त्या लढवून महाराष्ट्राची व्युत्पत्ती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. पण त्यांतील