पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५८१
खर्डा - अखेरचा विजय
 

नाही. इतकेच नव्हे, तर त्याला ते तहसुद्धा म्हणायला तयार झाले नाहीत. 'कन्व्हेन्शन' म्हणत. दादाला मात्र त्यांनी महादजीच्या हवाली केले. आणि त्याला महादजीने फौजफाटा बरोबर देऊन झाशीकडे रवाना केले. पण वाटेतच महादजीचा सरदार हरीबाबाजी यास ठार मारून, त्याची फौज उधळून देऊन, राघोबा इंग्रजांकडे पळाला व तेथे त्यांनी सुरतेस त्यास आश्रय दिला (जून १७७९).
 वडगावचा तह मान्य नसल्यामुळे, हेस्टिंग्ज याने मुंबईकरांना, पुणे दरबारशी दुसरा तह करावा, आणि ते पुणेकरांना मान्य नसेल तर पुन्हा युद्ध सुरू करावे, असा हुकूम दिला. गॉडर्ड आपली फौज घेऊन या वेळी सुरतेस पोचला होताच. त्यामुळे मुंबईकरांनी लगेच हालचाली सुरू केल्या.

नानाचा प्रचंड व्यूह
 यावेळी इंग्रजांची फसवेगिरी, कपटनीती हे सर्व पाहून, नाना फडणीस याने अखिल हिंदुस्थानभर पसरलेल्या इंग्रजांच्या सर्व ठाण्यांवर हल्ले करून, त्यांचा समूळ नाश करून टाकावा, या हेतूने एक प्रचंड व्यूह रचला. नागपूरकर भोसले यांनी बंगालवर, हैदर याने मद्रासवर, निजामाने पूर्व किनाऱ्यावर आणि मराठ्यांनी पश्चिम किनारा, गुजराथ या प्रदेशांवर एकदम हल्ले चढवून इंग्रजांना नामशेष करावयाचे, अशी ही योजना होती. या योजनेच्या विचारविनिमयास १७७९ च्या दसऱ्यास प्रारंभ झाला आणि १७८० च्या उत्तरार्धात, ती काही अंशी कार्यान्वित झाली. काही अंशी असे म्हणावयाचे कारण असे की या चौकडीपैकी भोसल्यास इंग्रजांनी १६ लाख रुपये लाच देऊन गप्प बसविले आणि निजामाने काहीच केले नाही. नागपूरकर भोसले यास कित्येक वर्षे इंग्रज चौथाई देत नव्हते. त्याने या वेळी चढाई केली असती तर १६ लक्षांपेक्षा किती तरी पट जास्त पैसा त्याला मिळाला असता. पण इंग्रज बहादुरांनी त्याला फितविण्यात यश मिळविले. हिंदुस्थान संपूर्णपणे इंग्रजांच्या हाती शेवटी गेला, त्याच्या अनेक कारणांपैकी हे एक आहे.
 निजाम व भोसले यांची ही स्थिती झाली. हैदरने मात्र आपली कामगिरी चोख बजावली. प्रथम त्याने अर्काटवर हल्ला करून ते घेतले व मग तो थेट मद्रासवर गेला आणि बेली, मनरो या इंग्रज सेनापतींचा पराभव करून त्याने मद्रासचे इंग्रजांचे ठाणे उखडून टाकण्याचा समय आणला. आता राहिले मराठे. त्यांनी काय केले ?

एकभाई
 मराठ्यांचा सर्व कारभार या वेळी बारभाईच्या हाती होता. प्रथम सखाराम बापू, नाना फडणीस, हरिपंत फडके, त्रिंबकराव पेठे व परशुरामपंत पटवर्धन हे लोक या बारभाईत होते. आणि प्रारंभी बापूच मुखत्यारीने सर्व कारभार पाहात असे. पण बापू हा नेहमी शत्रूला फितूर असे. माधवराव पेशव्यांच्या अंतकाली त्याची फितुरीची