पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
५८०
 

मराठे सरदार सहज फोडता येतात, हे त्यांच्या ध्यानी आले. या वेळी नागपूरकर भोसल्यांना हेस्टिंग्जने असेच फोडले होते. आणि दुसरे कारण म्हणजे, पुण्याला नानाने फ्रेंच वकिलास आश्रय दिला, हे होय. फ्रेंचांचा पाय हिंदुस्थानात स्थिर झाला, तर ते इंग्रजी सत्तेला भारी होतील, हैदर, निजाम, मराठे त्यास मिळतील, ही इंग्रजांस भीती होती. त्यामुळे त्वरा करून शिंदे, होळकर, पेशवे व भोसले यांच्या हद्दीतून युक्तियुक्तीने परवाने मिळवून, गॉडर्ड यास मोठी सेना देऊन, हेस्टिंग्ज याने मुंबईकडे पाठविले. मराठ्यांच्या कारभारात किती दुही, फितुरी व ढिलाई होती, हे यावरून ध्यानात येते. तात्यासाहेब केळकर यांनी 'मराठे व इंग्रज' या आपल्या सुप्रसिद्ध ग्रंथात लिहिले आहे की मराठ्यांनी मनात आणले असते तर, इंग्रजांच्या फौजाच काय, पण त्यांचे टपालसुद्धा आपल्या हद्दीतून त्यांनी जाऊ दिले नसते. म्हणजे इंग्रजांचा सगळा व्यवहारच हिंदुस्थानात बंद पडला असता. कारण जलमार्गाने इतकी वाहतूक करणे, त्या वेळी त्यांना शक्य नव्हते. पण मराठे सरदारांनी तसे कधी मनात आणले नाही! आणि इंग्रजांच्या फौजा आपल्या मुलखांतून खुशाल जाऊ दिल्या. या वेळी तर नागपूरकर भोसल्याने गॉडर्डच्या फौजांचे सरहद्दीवर जाऊन स्वागत केले व त्याला सन्मानाने जाऊ दिले. पण ती येऊन मुंबईस पोचण्यापूर्वीच इंग्रज मराठ्यांचे पहिले युद्ध संपले होते.

वडगाव
 दादाला घेऊन इंग्रजांची अडीच हजार फौज २५ डिसेंबर १७७८ रोजी खंडाळ्यास पोचली. पण या वेळी मराठ्यांत एकजुट बरी होती. तिने सर्व बाजूंनी इंग्रज फौजेला घेराव घातला व तिचा कोंडमारा केला. तिला अन्नपाणी मिळेना आणि मराठे हल्ल्यावर हल्ले करून त्या फौजेची कत्तल करू लागले. तेव्हा शरण येणे इंग्रजांस भाग पडले. आणि दादाला मराठ्यांच्या स्वाधीन करावयाचे, साष्टी वगैरे बेटे परत करायची आणि गुजराथेत जिंकलेला मुलखही परत करावयाचा, अशा अटी कबूल करून इंग्रजांनी आपली सुटका करून घेतली. या वेळी या सर्व कारभारात महादजी शिंदे प्रमुख होता. त्याच्याशी इंग्रजांनी स्वतंत्र निराळा करार करून, भडोच परगणा त्याला बहाल केला. हे करणे केव्हाही योग्य नव्हते. पण इंग्रजांचा तो डावच होता कारण यामुळे नाना आणि महादजी यांच्यात वितुष्ट येण्यास प्रारंभ झाला. इंग्रज प्रत्येक वेळी निरनिराळ्या मराठा सरदारांशी वेगळा तह करीत. त्यांचे ते बरोबरच होते. कारण त्यांना राज्य जिंकावयाचे होते. पण मराठा सरदार याला कबूल होत, हे मराठ्यांच्या संस्कृतीच्या दृष्टीने लक्षात घेतले पाहिजे.

तह मोडला
 वडगावचा हा तह इंग्रजांना इतका नामुष्कीचा होता की त्यांनी तो कधीही पाळला