पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
५८२
 

चिठ्ठी पेशव्याने स्वतःच बापूला दाखविली होती. तळेगावच्या स्वारीनंतर, महादजीच्या हाती, इंग्रजांना लिहिलेल्या त्याच्या हातच्या फितुरीच्या चिठ्ठ्या लागल्या. त्यावरून त्यास कैद करून नानाने त्यास रायगडावर ठेवले. तेथे तो ऑगस्ट १७८१ मध्ये मृत्यू पावला. मराठ्यांच्या कारभाराचा प्रमुख पुरुष, म्हणजे एका अर्थी राजाच, शत्रूला फितूर होता ! फत्तेसिंग गायकवाड गॉडर्डास फितूर झाला, भोसले हेस्टिंग्जला! तुकोजी होळकरांचे अंग सगळ्या फितुरीत असेच. यावरून मराठयांच्या राजकीय संस्कृतीची कल्पना येईल.
 हरिपंत, पेठे, पटवर्धन हे नानाच्या अगदी हातचे लोक होते. प्रत्यक्ष कारभारात लक्षही घालीत नसत. नाना करतील ते प्रमाण ! याचा अर्थ असा की बारभाईचे रूपांतर एकभाईत झाले. याविषयी आपण एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे की मराठ्यांच्या अमदानीत यावाचून दुसरे काही होणे शक्यच नव्हते. कारण व्यवस्था, पद्धत, नियम, कायद्याची शिस्त अशा काही कल्पनाच त्यांच्या मनात नव्हत्या. इंग्रजांचा मुख्य कारभारी वॉरन हेस्टिंग्ज. त्याच्या मदतीला एक कौन्सिल असे. पण त्याविषयी नियम ठरलेले होते. अनेक वेळा हेस्टिंग्ज याने जादा मताच्या अधिकारात निर्णय केलेले आहेत. म्हणजे कौन्सिलर विरुद्ध गेले तर काय करावयाचे, याविषयी नियम होते. शिवाय इंग्लंडमधील कंपनीचे डायरेक्टर हे सर्वाधिकारी होतेच. असे असूनही इंग्रजी कारभारात ढिलाई, अवज्ञा हे होत राही. पण पत्रे इकडची तिकडे पोहोचण्यासच त्या वेळी दोन ते सहा महिने लागत. अशा स्थितीत हा दोष अगदी क्षम्य होय. आणि हे ध्यानात घेतले तर इंग्रज म्हणजे मूर्तिमंत व्यवस्था व मराठे म्हणजे मूर्तिमंत गोंधळ असे दृश्य दिसते. आणि याच्या जोडीला मराठ्यांचा प्रमुख हा शत्रुला फितूर आणि इंग्रजांचा साधा शिपाई प्यादामुद्धा फितूर नाही- पूर्ण एकनिष्ठ; अशा या दोन संस्कृतींचा लढा येथे होता, त्याचा निर्णय काय होणार !

नाना - महादजी
 बारभाईत एकटा नाना सर्वाधिकारी झाला. आणि त्याच्या साह्याला महादजी शिंदे होता. या दोघांनी शेवटची वीस पंचवीस वर्षे मराठेशाही जिवंत ठेवली, असे वर म्हटलेच आहे. पण या दोघांची मने कधीच साफ नव्हती. राघोबा हरिबाबाच्या हातून निसटला, तेव्हा नानाला महादजीचा संशय आला होता. वडगावच्या तहाच्या वेळी त्यांचे बिनसल्याचे मागे सांगितलेच आहे. झाशीला राघोबाला नेऊन ठेवण्यात महादजीचा एक हेतू होता. पुण्याच्या कारभाऱ्यांच्या विरुद्ध, आपल्या हाती एक कायम शस्त्र असावे, असा महादजीचा डाव होता, असे महादजीचे चरित्रकार नातू यांनी आणि सरदेसाई यांनी पण म्हटले आहे. महादजीला बारभाईत प्रमुख स्थान हवे होते. नानाला त्याच्या लष्कराची नेहमी भीती वाटे. एकदा तर या दोघांची प्रत्यक्ष लढाई होणार, अशी अफवा पुण्याला उठली होती. तीवरून पुण्याला नानाचे हस्तक