पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५७९
खर्डा - अखेरचा विजय
 


मोरोबा दादा
 पण हे कारस्थान लगेच सिद्धीस गेले नाही. पुण्यावर आपण चालून गेल्यावर मराठा सरदार आपणास वश होतील की नाही, याची मुंबईकर इंग्रजास खात्री नव्हती. त्यामुळे घोळ पडला. मध्यंतरी मोरोबाचे कारस्थान झाले. तेव्हा हा योग येत होता. पण तेव्हाही हे जमले नाही. मोरोबा दादा हा नाना फडणीस याचा चुलत भाऊ. त्यास कारभारात अधिकार हवा होता. पण त्याच्या अंगी लायकी नव्हती. म्हणून नान बापू यांनी तो दिला नाही. तेव्हा त्याने मोठे कारस्थान रचले. हे एक प्रकरण पाहिले तरी, नारायणरावाचे वधानंतर मराठेशाहीला काय रूप आले होते, ते सहज कळते. मॉस्टिन हा पुण्याचा इंग्रजांचा वकील. तो या कटाचा सर्व सूत्रधार होता. त्याने मोरोबास चिथावणी दिली व नानास कैद करून राघोबाला मुंबईहून आणावयाचे, असे कारस्थान रचले. तुकोजी होळकर यास त्याने फितविले, इतकेच नव्हे, तर बापूसही वश करून घेतले. कारण त्यालाही नाना दुःसह होत होता. कोणतेही खूळ निघो, कारस्थान असो, सर्व मराठेशाहीला उभा चिरटा जावयाचा हे कायमचे ठरलेले होते. तसेच आता झाले. या वेळी कोल्हापूरकरांनी बंडाळी चालविली होती, म्हणून महादजी शिंदे तिकडे गुंतला होता. हरिपंत फडके व पटवर्धन कर्नाटकात होते. म्हणून मोरोबाला चांगली संधी मिळाली. नानाला तो कैदच करणार होता. पण बापूंनी मध्यस्थी केली. नानाने पड खाऊन कारभार सोडला व मोरोबा कारभारी झाला. नाना पुरंदरावर राहू लागला. तेथून सावधगिरीने त्याने महादजीस वश करून घेतले. हरिपंत, पटवर्धन यांस परत बोलाविले आणि डाव उलटविला. महादजीने इंदुरात दादा गेला असता त्याचा बंदोबस्त केला नाही हे खरे. पण त्यानंतर तोतयाचे बंड, कोल्हापूरचे प्रकरण व मोरोबाचे प्रकरण यांत त्याने सर्वस्वी नाना फडणिसाचा पक्ष घेतला, म्ह्णून तर पेशावाई वाचली. नाहीतर मॉस्टिनने याच वेळी दादाला पुण्यास आणून पेशवाईची इतिश्री केली असती.
 कोल्हापूरहून परत येताच मोरोबास व त्याच्या पक्षाच्या लोकांस महादजीने कैद केले. नानाची कारभारीपदावर स्थापना केली आणि सर्व घडी नीट बसवून दिली. या वेळी त्याने तुकोजी होळकरास समजुतीच्या गोष्टी सांगून नानाच्या पक्षास वळविले, म्हणून रक्तपात टळला.

मराठी सत्तेचे स्वरूप
 मोरोबा पदच्युत होऊन तुरुंगात गेला तरी, इंग्रजांचे राघोबाला पुण्यास आणण्याचे प्रयत्न थंडावले नाहीत. हेस्टिंग्ज याने आता उघड उघड पुरंदरचा तह मोडण्याचे ठरविले. त्याला दोन कारणे मुख्य होती. एक म्हणजे, मराठी राज्य समूळ नष्ट करून इंग्रजांना सर्व हिंदुस्थान जिंकता येईल, असे इंग्रजांना आता दिसू लागले. मोठे मोठे