पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
५७८
 

गेला आणि सुरतेला इंग्रजांच्या आश्रयास जाऊन राहिला. आणि अशा रीतीने मराठी राज्यात भाऊबंदकी, दुही, फितुरी यामुळे इंग्रजांचा प्रवेश झाला. शिंदे-होळकरांनी दादाला कैद करून त्याचा पक्का बंदोबस्त केला असता, तर हा प्रसंग आला नसता ! ते काही दादाच्या पक्षाचे नव्हते. सवाई माधवरावास त्यांची मान्यता होती. तेव्हा दादास कैद करून पेशव्याचा मार्ग निर्वेध करणे, हे त्यांचे कर्तव्यच होते. पण ते त्यांनी केले नाही. आणि इंग्रजांचा हात मराठेशाहीत शिरला.

सुरत- पुरंदर
 दादा-राघोबा - इंग्रजांकडे गेल्यावर प्रथम त्यांनी सुरतेला त्याच्याशी तह केला (मार्च १७७५). इंग्रजांनी दादाच्या मदतीस अडीच हजार फौज द्यावी, त्याबद्दल दादाने इंग्रजांना साष्टी, वसई, त्यांजवळची बेटे कायमची द्यावी, सहा लाख रुपये रोख द्यावे व फौजेच्या खर्चासाठी दरमहा दीड लाख रु. द्यावे, अशा त्यात मुख्य अटी होत्या. कलकत्त्याचा गव्हर्नर हेस्टिंग्ज हा इंग्रजांच्या सर्व ठाण्यांचा प्रमुख होता. त्याने मुंबईकरांचा हा तह नामंजूर केला. मराठ्यांच्या कारभारात हात घालणे कंपनीला धोक्याचे आहे असे त्याचे मत होते. म्हणून सुरतेचा तह रद्द करून त्याने अष्ठन नामा वकील, दुसरा तह करण्यासाठी, पुण्याला पाठविला व त्याने बारभाईचे कारभारी बापू व नाना यांनी दुसरा तह ठरविला. हा पुरंदरचा तह होय (मार्च १७७६). साष्टी इंग्रजांनी घेतलीच आहे. ती त्यांकडेच राहावी, दादासाठी झालेल्या खर्चाबद्दल इंग्रजांना १२ लाख रु. द्यावे, गुजराथेत फत्तेसिंग गायकवाड याने भडोच व इतर पाच लक्षांचे परगणे इंग्रजांना दिले आहेत, ते त्यांच्याकडेच रहावे, आणि दादाने दंगाधोपा, अथवा फितूर न करता नक्त तीन लाखांची नेमणूक घेऊन गंगा- तीरी राहावे, असे या तहाअन्वये ठरले.

नामुष्की
 हा तह मराठ्यांना अत्यंत नामुष्कीचा होता. पण याच वेळी हैदराने मराठ्यांचा कृष्णेपर्यंतचा मुलूख आक्रमिला होता. सातपुड्यात दादाने कोळी लोकांस चिथावल्यामुळे त्यांनी दंगा आरंभिला होता, पटवर्धनाच्या घरात फूट पडली होती, शिंदे-होळकर माळव्यात स्वस्थ बसून होते, प्रतिनिधी, कित्तूरचे देसाई यांनी दंगा सुरू केला होता; तोतयाचे बंडास पुन्हा सुरुवात झाली होती, आणि फौजेचे पगार थकले होते. या कारणांमुळे कारभाऱ्यांनी पडते घेऊन, पुरंदरचा तह मान्य केला. पण मौज अशी की मुंबईकरांनी, कलकत्त्याची आज्ञा न मानता, पुरंदरचा तह मान्य करण्याचे साफ नाकारले व दादांचा पक्ष घेण्याविषयी कंपनीकडे विलायतेस अर्ज केला. हा वाटाघाटीचा घोळ पडला असताना हेस्टिंग्जचे मतही बदलले आणि त्याने मराठ्यांशी युद्ध करावे व दादाला पेशवाईवर बसवावे, या विचाराला पाठिंबा दिला.