पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५७७
खर्डा - अखेरचा विजय
 

मनात हा विचार होता. जानोजी भोसले याच्या मनात सातारची गादी घेण्याचा विचार होता. पण ते पद तो निजाम किंवा इंग्रज यांच्या साह्याने मिळविणार होता. याला वर मांडलेल्या विचाराच्या दृष्टीने काहीच अर्थ नव्हता. तात्पर्य असे की दुसरा राजवंश सत्तापदी आणावा इतकीसुद्धा कर्तबगारी मराठ्यांच्या ठायी नव्हती.

संस्था आणि अनुवंश
 तेव्हा मराठे व इंग्रज हा सामना प्रारंभापासूनच विषम होता. नवा, गुणकर्तृत्वसंपन्न पुरुष सत्तापदी येण्याची सोयच मराठी राज्यात नव्हती. केवळ पेशव्यांचीच नव्हे, तर भोसले, गायकवाड, आंगरे, पवार, पटवर्धन, पेठे, रास्ते या सर्व सरदारांच्या घराण्यांची पद्धत हीच होती. माणूस गुणी असो वा नसो, तो सत्तापदी यावयाचाच. इंग्रजांच्या संस्थात्मक कारभारात हे कधी घडले नाही. त्यामुळे मराठे व इंग्रज या सामन्याचा निर्णय प्रथमपासूनच ठरलेला होता. नाना आणि महादजी हे दोन कर्ते पुरुष या वेळी मराठ्यांना लाभले, म्हणून वीसपंचवीस वर्षे कशी तरी मराठेशाही टिकली एवढेच !
 आता पूर्वीप्रमाणेच या वीसपंचवीस वर्षाच्या काळाचे राजकीय संस्कृतीच्या दृष्टीने निरीक्षण करू.

इंग्रजांचा प्रवेश
 नारायणरावाच्या खुनानंतर अर्थातच रघुनाथराव दादा पेशवा झाला. सखाराम बापू, नाना व इतर अनेक सरदार यांना दादाविषयी वहीम होता. पण निश्चित पुरावा त्यांच्या हाती नव्हता तोपर्यंत त्यास उघड विरोध करणे शक्य नव्हते. नारायणरावाचे खुनानंतर निजाम, हैदर यांनी पुन्हा उचल केली. तेव्हा त्यांच्या बंदोबस्तासाठी, सप्टेंबर १७७३ रोजी, दादा बाहेर पडला. पण मागे रामशास्त्री यांनी, दादानेच हा खून करविला, असा निश्चित निर्णय दिला; तेव्हा जानेवारी १७७४ मध्ये सखाराम बापू, नाना फडणीस, हरिपंत फडके यांनी बारभाईचे कारस्थान रचले आणि उघडपणे गंगाबाईच्या नावाने पुरंदरावरून कारभार आरंभिला. पुढे एप्रिलमध्ये गंगाबाईस पुत्र झाला. त्यामुळे बारभाईला नैतिक पाठबळ मिळाले. आणि मराठे सरदारही त्यांच्या पक्षाचे होऊन, स्वारीतून दादाला सोडून परत येऊ लागले. परत आल्यानंतर नव्या पेशव्याच्या सत्तेच्या दृष्टीने दादाला पकडणे बाराभाईला अवश्यच होते. त्याप्रमाणे हरिपंत फडके, त्रिंबकराव मामा पेठे इ. सरदार त्यांनी दादावर पाठविले. त्यांची कासेगाव येथे लढाई झाली. पण त्यात मामा पेठे मारला गेला. आणि दादा निसटून, हरिपंत त्याच्यामागे असूनही, इंदुरास होळकरांकडे गेला. तेथे महादजी शिंदेही होते. त्या दोघांनीही, पेशव्याला पकडण्याचे अपेश नको म्हणून, त्याला पकडले नाही. आणि सर्व प्रश्नांची चर्चा करण्यासाठी कारभारी- नानाबापू- यांनाच बोलवले. पण तापीतीरावर ते पोचण्याच्या आधीच दादा निसटून गुजराथेत
 ३७