पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
५७६
 

फडणिसाने वीस वर्षे मराठी सत्ता टिकवून धरली, ही त्याची फार मोठी कर्तबगारी होय, यात शंका नाही. इंग्रजांशी लढताना, आणि पुढे १७९५ साली निजामाशी लढताना, सर्व मराठा मंडळ- राज्यातले सर्व सरदार- त्याने हुकमत, आर्जव, विनंती अशा निरनिराळ्या मार्गानी एक कार्यवाही केले, आणि दोन्ही लढायांत मराठ्यांना जय मिळवून दिला, हे त्याचे कर्तृत्व इतिहास कधी विसरणार नाही. पण मराठी राज्याचा तो खरा एकमुखी सत्ताधारी धनी असता तर या राज्याचा उत्कर्ष याच्या दसपटीने झाला असता. पण सत्ताश्रेणीत नानाचे स्थान तिय्यम असल्यामुळे, १९७४ च्या पुढे मराठी राज्यात सर्वत्र बजबजपुरी माजली होती, आणि ती नष्ट करण्याची सत्ता त्याच्या हाती नव्हती.

नवा शत्रू
 एकीककडे सत्तापदाचा असा ऱ्हास झाला असता, दुसरीकडे मराठी राज्याला नवा शत्रू निर्माण झाला, तो पूर्वीच्या कोणत्याही शत्रूपेक्षा अनेक पटींनी भारी. तो म्हणजे इंग्रज. नवी शस्त्रास्त्रे, नवे सुसज्ज लष्कर, नवी विद्या, नवे विज्ञान आणि अविचल अशी राष्ट्रनिष्ठा या गुणांनी, इंग्रज हा मराठ्यांच्या तुलनेने केव्हाही भारी होता. मराठा सरदाराने एखादा मुलूख जिंकला की तोच त्याचा धनी होई आणि तोही वंशपरंपरेने ! असा प्रकार इंग्रजी राज्यात कधी झाला नाही. वॉरन हेस्टिंग्ज, क्लाइव्ह, कॉर्नवॉलिस यांनी हिंदुस्थानात मोठमोठे प्रदेश जिंकले. पण, त्यांचा मुलगा त्या पदावर आला, असे कधीही झाले नाही. आणि त्यांना स्वतःलासुद्धा त्या मुलखाचा धनीपणा कधी प्राप्त झाला नाही. मुदत संपली की ती सत्ता, ते ऐश्वर्य एका क्षणात सोडून ते स्वदेशी जात व एक सामान्य माणूस म्हणून जगत. याचा अर्थ असा की इंग्रजांचा राज्यकारभार हा संस्थात्मक होता. एक कर्ता माणूस गेला की सर्व संपले, असे इंग्लंडात कधी होत नाही. संस्था कायम असते व ती दुसरा कर्ता पुरुष त्या जागी नेमू शकते. ही व्यवस्था मराठ्यांना कधी निर्माण करता आली नाही. शिवछत्रपतींचा तसा प्रयत्न होता. पण ते जाताच सर्व कारभार पुन्हा पहिल्या चाकोरीतून चालू झाला. राजवंश तसा चालू झाला, इतकेच नव्हे, सर्व सरदारांचे मुलूखही वंशपरंपरेने त्यांच्याकडे राहू लागले. पेशव्यांच्या घराण्यात एकामागे एक चार पुरुष कर्ते निपजले हा दैवयोग होय. पण थोरले माधवराव जाताच मराठमंडळाने एकत्र विचार करून पेशवेपदी महादजी शिंदे किंवा नागपूरकर भोसले, गायकवाड, पवार यांच्यापैकी कोणा तरी कर्त्या पुरुषाला नेमावयास हवे होते. हा विचार या आधीच छत्रपतींच्या बाबतीतही करावयास हवा होता. शाहू महाराजांच्या नंतर, वारशासाठी भोसलेवंशीय माणसाची शोधाशोध चालू झाली. विजयनगरच्या राज्यात एकंदर चार राजवंश झाले. म्हणून तर दोनअडीचशे वर्षे वरचेवर कर्ते पुरुष सत्तापदी येऊ शकले. मराठ्यांनी हेच धोरण ठेवावयास हवे होते. नागपूरचे भोसले यांच्या