पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५६३
मराठ्यांच्या कर्तृत्वाचा हिशेब
 


मराठा सरदार
 मराठे निमाजाच्या मुलखात शिरले होते. पण तसाच निजामही मराठ्यांच्या मुलखात शिरून सर्वत्र जाळपोळ, लूट, विध्वंस, संहार करीत होता. पुण्याच्या आसपासची अनेक गावे त्याने जाळली, पर्वतीच्या मूर्ती फोडल्या, आणि नुसता प्रलय उडवून दिला. या वेळी गोपाळराव पटवर्धन, जानोजी भोसले हे निजामास मिळाले होते ! माधवरावाने त्यांना प्रथम वळविले. मल्हारराव होळकर दक्षिणेत होता. त्याला मदतीला बोलाविले, तेव्हा दहा लक्षांची जहागीर दिली तर येऊ, असे त्याने सांगितले ! द्यावी लागली. चंद्रसेन जाधवाचा मुलगा रामचंद्र जाधव निजामाला फितूर झाला. त्यास वळवून परत आणले. तेव्हा स्वारीत रेंगाळत राहून त्याने मराठ्यांचाच मुलूख लुटला; आणि त्यातही पंढरपूर क्षेत्र लुटून फस्त केले. (त्यानंतर पुन्हा तो निजामाकडे गेला. तेथे फितुरीचा संशय येऊन निजामाने त्यास दगा करून ठार मारले.) माधवरावाचा पराक्रम पाहून रघुनाथरावाने पत्रात त्याची तोंड भरून स्तुती केली. आणि त्याच्यावर सर्व भार सोपवून, आपण क्षेत्री जाऊन स्नानसंध्या करीत राहणार, असे लिहिले. पण अंतरात त्याला अतिशय वैषम्य वाटत होते. सखाराम बापू आणि मंडळी त्यास चिथवीत होती. तेव्हा गृहकलहाच्या नाटकास खरा प्रारंभ येथूनच झाला, असे म्हटले पाहिजे.

हैदराबादचा सांभाळ
 हैदर अल्ली हा निजामासारखाच दक्षिणेतला मराठ्यांचा दुसरा शत्रू. तसाच किंवा त्याहूनही जास्त जबरदस्त. पानपतचे वृत्त ऐकून त्यानेही मराठ्यांच्या राज्यात उच्छाद मांडला आणि १७६३ च्या जूनपर्यंत कृष्णेपर्यंतचा मराठ्यांचा सर्व मुलूख बळकावला. कृष्णेपर्यंत हैदर स्वराज्य करणार, असे मोठे भय निर्माण झाले. पण, राक्षसभुवनवर निजामाचा पुरा बंदोवस्त होईपर्यंत, माधवरावास त्याच्याकडे लक्ष देण्यास फुरसदच झाली नाही. त्या साली तो मोकळा होताच त्याने १७६४ च्या जूनमध्ये हैदरावर पहिली स्वारी केली आणि सावनूर, धारवाड, हावेरी, अनवडी या ठिकाणी प्रचंड संग्राम करून तुंगभद्रेपर्यंतचा मुलूख त्याने सोडविला. आणि जून १७६५ मध्ये तो परत पुण्यास आला. नोव्हेंबर १७६६ ते जून १७६७ पर्यंत दुसरी मोहीम करून तुंगभद्रेच्या दक्षिणेस शिरे, होसकोट, बाळापूर, इ. जुनी स्वराज्यातील ठाणी त्याने काबीज केली. तिसरी स्वारी नोव्हेंबर १७६९ ते १७७० पर्यंत झाली आणि चवथी जून १७७० ते जून १७७२ अशी दोन वर्षे चालली. चौथ्या स्वारीत स्वतः माधवराव नव्हता. त्याची प्रकृती फार बिघडली होती. या शेवटच्या चौथ्या स्वारीत त्रिंबकराव पेठे याने मोमीतलावच्या लढाईत हैदराचा पार धुव्वा केला. त्याचे ४० हजार लोक कापून काढले व तोफा व सामान अगणित लुटले. या वेळी हैदराचा