पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
५६४
 

पुरा निःपात करावयाचा असे त्रिंबकराव मामांनी- पेठ्यांनी ठरविले होते. पण माधवराव फारच आजारी झाल्याचे वृत्त आले. हैदराच्या कानी हे वृत्त होतेच. म्हणून तोही घोळ घालीत होता. दादाकडेही त्याचा पेश होताच. (माधवरावाच्या पहिल्या स्वारीत तहाच्या वेळी दादानेच हैदराला संभाळून घेतले होते.) त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळचा सर्व मुलूख ताब्यात देण्याच्या अटीवर तह करून त्रिंबकराव मामा परत आले.

राष्ट्रभावना नाही
 हैदराच्या या स्वाऱ्यांच्या वर्णनाचा समारोप करताना, नानासाहेब सरदेसायांनी काय लिहिले आहे ते सांगतो. त्यावरून मराठ्यांच्या विषयीचे त्यांचे मत कळून येईल. 'पेशवा मरण पावला की मराठ्यांचा जोर खलास झाला हे हैदराने ताडले होते. त्याचे सर्व वकील आप्पाजीराम वगैरे दक्षिणी ब्राह्मणच होते. (निजामाचे प्रमुख कारभारी रामदासपंत आणि विठ्ठल सुंदर हे ब्राह्मणच होते हे आपल्याला माहीतच आहे.) त्याच्या (हैदराच्या) फौजेत सुद्धा ब्राम्हण व मराठे सरदार व लोक पुष्कळ होते. म्हणजे या वेळी सुद्धा, माधवराव पेशव्यासारख्या राष्ट्रासाठी झगडणाऱ्या पुरुषाच्या अमदानीतही अनेक मराठे लोक शत्रुपक्षास सामील होते व वेतने आणि बक्षिसे घेऊन स्वराष्ट्रघात करीत होते. म्हणजे औरंगजेबाने दक्षिणेत मराठ्यांशी युद्ध चालविले त्या वेळचा प्रकार व हा हल्लीचा हैदरच्या वेळचा प्रकार अगदी सारखा होता. मुंबईससुद्धा इंग्रज वगैरे जे प्रतिस्पर्धी कारस्थाने करीत होते त्यास मुख्य प्रोत्साहन ब्राम्हण वगैरे सर्व जातींकडून मिळत होते. म्हणजे मराठ्यांच्या अंगी राष्ट्रीय भावनेचा एवढा अभाव होता. ऐन भरभराटीच्या काळी सुद्धा उत्कृष्ट राष्ट्राभिमान मराठ्यांचे ठिकाणी कधीच व्यक्त झाला नाही.' (मराठी रियासत, मध्य विभाग ४, पृ. ९२)

दौलतीची वाटणी
 केवळ रघुनाथराव दादा याचे प्रकरण पाहिले तरी राष्ट्र, एकसमाज, एकता, संघटना या कल्पनेला मराठे किती पारखे होते ते दिसून येईल. निजाम व हैदर यांना संभाळून ठेवणे हे त्याचे पहिले राष्ट्रद्रोही कृत्य आणि हा सल्ला त्याला सखारामबापू- सारख्या मोठ्या सरदारांनी दिला होता आणि अशा या दादाच्या पक्षाला चिंतो विठ्ठल, आबाजी पुरंदरे, सखाराम हरी, गायकवाड, भोसले, अशी मातबर मंडळी होती. पुढे दादा माधवरावाजवळ दौलतीची वाटणीच मागू लागला. म्हणजे हे राज्य आहे, राष्ट्राची दौलत आहे असा भाव त्याच्या चित्तात मुळीच नव्हता. कुटुंबात ज्याप्रमाणे भावाभावांत जिंदगीच्या मिळकतीच्या वाटण्या होतात, तशीच वाटणी याही दौलतीची व्हावी, अशी दादाची मागणी होती. ती मान्य होईना, तेव्हा त्याने फौजेची जमवाजमव करून, माधवरावाशी लढाई करून वाटणी किंवा पेशवाई