पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
५६२
 

 पेशवा माधवराव याच्या कर्तबगारीचा आराखडा वर दिला आहे. आता त्याच्या या दहाबारा वर्षांच्या कारकीर्दीतील काही प्रमुख घटना व त्या वेळी दिसून येणारे प्रमुख मराठा सरदारांचे शील व चारित्र्य पाहू, म्हणजे मराठ्यांच्या साम्राज्यसत्तेचे व त्यांच्या सामर्थ्याचे स्वरूप काय होते ते ध्यानात येईल.

दादा- बापू
 पानपतच्या पराभवाची व नानासाहेबाच्या मृत्यूची वार्ता कानी पडताच निजामाला नवीन हुरूप आला आणि त्याने मराठ्यांच्या मुलखावर चढाई केली. त्याचा प्रतिकार करण्यासाठी राघोबाने मोठी फौज जमविली. पटवर्धन, गायकवाड, विठ्ठल शिवदेव, विसाजी कृष्ण, नारो शंकर, जानोजी भोसले अशा सरदारांची मिळून सत्तर हजार फौज जमा झाली व या सरदारांनी दोनचार लढायांत निजामाला अगदी जेर केला. या वेळी निजामाला साफ बुडवावा, असा यातील बहुतेक सरदारांचा विचार आणि आग्रह होता. आणि ते सहज शक्य होते. पण एवढ्या अवधीत, माधवराव पेशव्याचे तेज, राघोबाच्या पक्षाचा प्रमुख जो सखाराम बापू त्याच्या ध्यानी आले होते. त्याने गुप्तपणे दादाला सल्ला दिला की निजामला साफ नाहीसा करू नये. त्याने पेशवा अगदी निरंकुश होईल. पुढे मागे आपल्यालाच निजामाचे साह्य लागेल. तेव्हा आता त्याशी सलूख करावा! दादाला हा सल्ला तत्काळ पटला. आणि त्याने, सर्व सरदारांचा विरोध असूनही, आपल्या अखत्यारीत, उभयपक्षी कोणी काही न देता आपापल्या स्थळी परत जावे, असा निजामाशी तह केला! पुढे घोडनदीच्या लढाईत (नोव्हेंबर १७६२) माधवरावाचा पराभव झाला. त्या वेळी निजाम दादाच्या साह्यास आला होता. या वेळी तर त्याने उद्गीरच्या लढाईत मराठ्यांनी निजामाचा जिंकलेला साठ लक्षांचा मुलूख निजामाला परत देऊन टाकला. दादा आणि बापू यांची अशी ही जोडी होती. त्या वेळच्या अनेक पत्रांत, 'सखाराम बापू सर्वनाश करावया निर्माण झाला आहे,' 'तो सर्व दौलत लयास नेईल' असे अनेकांचे उद्गार आढळतात. दादाला तर पेशवाईतील कलिपुरुषच म्हणत असत. हे मराठ्यांचे चारित्र्य!

केवळ जीवदान !
 पुढे राक्षसभुवनची लढाई झाली (ऑगस्ट १७६३) . त्या लढाईत माधवराव पेशव्याची लोकोत्तर कर्तबगारी प्रथम दिसून आली आणि निजामाच्या सैन्याचा संहार होऊन मराठ्यांना फार मोठा विजय मिळाला व गेलेला सर्व मुलूख त्यांना परत मिळाला. हे मराठ्यांचे यश अतिशय उज्ज्वल असे आहे, हे खरे. पण त्याच्या आधीच्या घडामोडी लक्षात घेतल्या म्हणजे माधवरावाच्या पराक्रमामुळे मराठेशाहीला काही काळ मिळालेले हे केवळ जीवदान आहे, हे लक्षात येते.