पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५६१
मराठ्यांच्या कर्तृत्वाचा हिशेब
 

वावयास हवे. 'सेनापतीचे कर्तृत्व' यात हा सगळा अर्थ येतो. भाऊसाहेब हा तेजस्वी होता, पराक्रमी होता, स्वाभिमानी होता. पण एवढेच ! सेनापती या पदाला एवढे पुरत नाही. शत्रूच्या बातम्या, त्याची मर्मस्थाने, स्वपक्षाला लोक वळवून घेणे, अत्यंत मोठया आपत्तीतही शांत राहण्याची शक्ती, स्वपर बलाबल जाणण्याची शक्ती इ. अनेक गोष्टी या कर्तृत्वात येतात. मराठ्यांच्या बाजूला असा सेनापती कोणीच नव्हता. दत्ताजीचा बळी गेला, आणि पानपतचा अनर्थ ओढवला, या दोन्ही आपत्ती टाळणे शक्य होते. पण यासाठी फार निराळ्या दर्जाचे कर्तृत्व अवश्य होते.

वंशपरंपरा
 पानपतला मराठ्यांचा पराभव झाला, एक संबंध पिढी कापली गेली आणि मराठी सत्ता एकदम कमजोर झाली. त्याबरोबर चौथाई साम्राज्याच्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे हे साम्राज्य विरघळू लागले. दक्षिणेत हैदर आणि निजाम यांनी, मराठ्यांनी चौथाई बसविलेला, म्हणजेच त्यांच्या साम्राज्याचा सर्व भाग, गिळंकृत केला आणि उत्तरेत रजपूत, जाट व रोहिले यांनी पण तेच करण्याची वेळ आणली. या सर्वाना आवर घालावयाचा तर नवीन पेशवा माधवराव, हा एक तर वयाने लहान, सोळा सतरा वर्षाचा आणि त्याच्या घरात भाऊबंदकी माजलेली ! वंशपरंपरा सरंजाम, अधिकार, सत्ता जावयाची, अशी पद्धत असते तो देश उत्कर्षाला जाणे फार अवघड होऊन बसते. कारण बापासारखा मुलगा कर्ता निपजतोच असे नाही आणि भाऊबंदकीमुळे घराणे पार दुबळे होऊन बसते. छत्रपत्रींच्या घरात भाऊबंदकी, आंगऱ्याच्या घरात भाऊबंदकी, नागपूरकर भोसल्यांच्या घरात भाऊबंदकी, गायकवाड, जाधव, सर्वत्र भाऊबंदकी! आणि शेवटी पेशव्यांच्या घरात भाऊबंदकी! आणि ही भांडणे साधीसुधी नाहीत तर प्रत्यक्ष लढाया! यामुळेच शिवछत्रपतींनी वंशपरंपरा पद्धती नष्ट करण्याची योजना आखली होती. पण त्यांच्यानंतर तसा थोर पुरुष पुन्हा निर्माणच झाला नाही आणि वंशपरंपरा पद्धत चालू राहिली. आणि तिच्यामुळे मराठी साम्राज्य अशक्य होऊन बसले.
 पानपतच्या धक्क्याने नानासाहेब मृत्यू पावला, तेव्हा माधवराव पेशवा झाला; पण तो लहान असल्यामुळे सर्व अधिकार चुलता रघुनाथराव याने बळकावला आणि पुतण्याला जवळ जवळ कैदेतच ठेवले. पण माधवरावाच्या ठायी लहान वयातही असामान्य कर्तृत्व असल्यामुळे त्याने लवकरच हाती सत्ता घेतली आणि निजाम, हैदर यांची आक्रमणे मोडून काढून मराठ्यांची साम्राज्यसत्ता पुन्हा प्रस्थापित केली आणि पाचसहा वर्षांनी उत्तरेत फौजा धाडून, रोहिल्यांचा पराभव करून तेथेही पानपतपूर्वीचा सर्व प्रदेश पुन्हा ताब्यात घेतला. पण माधवराव अतिशय अल्पवयी निघाला, त्याला अठ्ठाविसाव्या वर्षीच मृत्यू आला, आणि नंतर भाऊबंदकी विकोपाला जाऊन नारायण. रावाचा खून झाला आणि पुन्हा मराठी साम्राज्य दक्षिणेत व उत्तरेत शून्यवत झाले.

 ३६