पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
५६०
 

नादिरशहाच्या वेळेपासून रणांगणात वावरणारा आणि चौफेर दृष्टी फेकणारा कसलेला सेनापती होता. मराठ्यांच्याकडे तसा एकही माणूस नव्हता. पानपताच्या अपयशाला नैसर्गिक आपत्ती कारणीभूत झाल्या, असे म्हणतात. पण त्यांवर मात करणे मुळीच अवघड नव्हते. निघण्याच्या आधीपासून पुढे वकील पाठवून नाना आणि भाऊ यांनी पंजाबातील शीख आणि राजस्थानातील रजपूत यांच्याशी, मागल्या चुका निस्तरून, हिंदुपदपातशाहीच्या दृष्टीने, संधान बांधावयास हवे होते. म्हणजे रसदेची अडचण त्यांना भासली नसती आणि रजपुतांच्या आणि मराठ्यांच्या कात्रीत अबदाली सापडला असता. सुजाउद्दौला व इतर मुसलमान यांना वश करून ठेवणे, हे काम नजिबखान व अबदाली यांनी केले होते. मुस्लिम विरुद्ध हिंदू हा रंग पानपताला नजीबाने चढविला होता. या उलट रजपूत व जाट यांना मराठ्यांनी शत्रू करून ठेविले होते. तरी जाटाशी थोडा समझोता झाल्यामुळे, पानपतनंतर पळून जाणाऱ्या हजारो मराठ्यांना जाटांनी आश्रय देऊन, त्यांची दक्षिणेत जाण्याची, लाखो रुपये खर्चूनही, व्यवस्था केली. रजपूत व शीख आधीपासून अनुकूल असते तर अबदाली शिल्लकच राहिला नसता, हे यावरून सहज ध्यानात येईल.
 दुसरी गोष्ट म्हणजे, यमुनेला अकल्पित उतार झाला त्याचा फायदा घेऊन, अंतर्वेदीतून अबदाली दिल्लीजवळ येऊन बसला. त्याचा फायदा घेऊन कुंजपुऱ्याहून परत येऊन भाऊसाहेबांनी त्याच्यावर लगेच चाल केली असती तर त्याचा साफ धुव्वा उडाला असता. कुंजपुऱ्याला अबदालीने साठविलेले दोन लक्ष मण गहू व इतर धन मराठयांना मिळाले होते. ते ताजेतवाने झाले होते. पण तशी चाल न करता पानपतजवळ सव्वा दोन महिने भाऊसाहेब खंदक खणून स्वस्थ बसून राहिला. आणि दाणा नाही म्हणून घोडी मेली, खायला नाही म्हणून शिपाई हतबल झाले, अशा वेळी अबदालीवर चाल केली ! अबदालीला अंतर्वेदीतून रसद मिळत होती आणि अफगाणिस्तानातून त्याने नव्या दमाचे सहा हजार घोडेस्वार आणविले होते. हे बलावल ज्याला कळले नाही, केव्हा चाल करावी हे उमगले नाही, तो कसला सेनापती ! शेवटी विश्वासरावास गोळी लागली व तो मृत्यू पावला. तेव्हा शांत चित्ताने भाऊसाहेबाने माघार घेतली असती, सैन्य पांगू दिले नसते, धनी गेला तरी घाबरू नका, असा लष्कराला धीर दिला असता, तरी संहार झाला नसता. खालून नानासाहेब स्वतः येतच होता. तोपर्यंत लढाईच घ्यायची नाही, हुलकावण्या देत राहायचे, असे सदाशिवरावाने डावपेच लढविले असते तरी पानपतला जय मिळाला असता. पण 'आता नानासाहेबांना तोंड काय दाखवावयाचे !' असा सेनापतीस न शोभणारा विचार त्याने केला आणि महाअनर्थ ओढवून घेतला. लढाई न करता, सेनेचा गोल बांधून, केवळ अबदालीची फळी फोडून पलीकडे जावयाचे, असे आदल्या रात्री ठरले होते, असे म्हणतात ! पण हा डाव सर्व सेनेला समजण्यास अवधीच मिळाला नाही, असे कोणी सांगतात. याचा तरी अर्थ काय ? जे धोरण, जे डाव लढवावयाचे ते अत्यंत काळजीपूर्वक लढ-