पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५५९
मराठ्यांच्या कर्तृत्वाचा हिशेब
 

याशिवाय अनेक पैलू असतात. कोणती तरी एक प्रबळ निष्ठा, भौतिक विद्या, शेती, व्यापार यांचे उत्कृष्ट ज्ञान, यांची चर्चा वर केलीच आहे. या सर्व कर्तृत्वाचा हिशेब केला तर मराठ्यांच्या ठायी ते अत्यंत अल्पांशाने होते. जवळ जवळ नव्हतेच, असे म्हटले तरी चालेल. रणांगणातला पराक्रम, वीरश्री, शौर्य, धैर्य हा गुण त्यांच्या ठायी होता. पण सावधता, मुत्सद्देगिरी, शत्रुमित्रांचे सम्यक् ज्ञान, यांच्या अभावी ती वीरश्री सर्व व्यर्थ होते.

निष्कारण
 दत्ताजी शिंदे याचा वध आणि पानपत प्रकरण यांचा विचार करता, ही संकटे मराठ्यांनी निष्कारण आपल्यावर ओढवून घेतली, असेच इतिहासकार सांगतील. नजीबखान हा हरामखोर आहे, घातकी आहे, कपटी आहे, धूर्त आहे, हे दत्ताजी शिंद्याला आधीपासूनच माहीत होते. पेशव्यांनी पत्रांतून हे त्याला लिहिले होते. जनकोजी, नारो शंकर, अंताजीपंत हे त्याला परोपरीने सांगत होते की नजिबाचे पारिपत्य प्रथम केले पाहिजे. पण तरीही दत्ताजी दीर्घ काळ त्याच्यावर विश्वासून राहिला. दुसरी एक विचित्र गोष्ट ! तिच्यावर विश्वास ठेवणे सुद्धा कठीण वाटते; पण इतिहासातच ती नमूद केलेली आहे. २४ डिसेंबर १७५९ रोजी दिल्लीजवळ अबदालीवर चालून जाताना दत्ताजीने बुणगे, सामान यांबरोबरच तोफखानाही मागे ठेवला ! गिलच्यावर चालून जाताना तोफखाना मागे ठेवणे, ही काय कल्पना आहे ? पण याहीपेक्षा एक अजब गोष्ट आहे. १० जानेवारी १७६०- (या लढाईतच दत्ताजीचा वध झाला)- रोजी, साबाजीची फौज नजीबखानाच्या रोहिल्यांशी लढण्यास पुढे झाली तेव्हा, मराठ्यांजवळ बंदुकाही नव्हत्या. फक्त भाले व तलवारी यांनी हत्तीवरचे जंबुरे (फिरता, लहान तोफखाना) असलेल्या रोहिल्यांशी ते लढत होते. या लढाईतले दत्ताजीचे शौर्य हे अपूर्व आहे, अलौकिक आहे. 'बचेंगे तो और भी लढेंगे' हे अमर उद्गार या वेळचेच आहेत. पण नजीबखानावर विश्वास ठेवला नसता, आणि तोफा, बंदुका यांनी फौज सुसज्ज ठेविली असती, तर पुन्हा लढण्याची पाळीच आली नसती. इब्राहिम खानाच्या तोफखान्याची पानपत प्रकरणी विशेष तारीफ केली जाते. पण अबदालीच्या हत्तीवरच्या जंबुऱ्यांनी जास्त चांगले काम केले, असे खुद्द सरदेसायांनीच लिहिले आहे. हे जंबुरे मराठ्यांजवळ का नव्हते ? पण बंदुकासुद्धा ठेवण्याचे अवधान ज्यांनी बाळगले नाही, त्यांच्याबद्दल काय म्हणावे ?

सेनापती
 जी गोष्ट दत्ताजीची तीच सदाशिवराव भाऊची होती. त्याने एकदोन लढाया जिंकल्या होत्या. पण अबदालीसारखा तो काही खरा सेनापती नव्हता. अबदाली हा