पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
५५६
 

वर दोघांनाही सांभाळण्याचे काम राघोबाने केले. हिंदुपदपातशाहीची खरी निष्ठा सर्व मराठ्यांच्या ठायी असती, तर ते कार्य खरोखरच अवघड नव्हते. पण दुही, फितुरी, बेशिस्त आणि केवळ स्वार्थ !

अटकेपार
 दिल्लीचे राजकारण उरकून रघुनाथराव पंजाबात शिरला. मोगल सरदार आदिना बेग आणि शीख यांनी त्याला बोलावलेच होते. मराठे पंजाबात शिरताच अबदालीचे सुभेदार पळून गेले. तेव्हा मराठे तशीच दौड करीत अटकेपावेतो गेले. आणि तेथे त्यांनी झेंडे लावले. यासंबंधी लिहिताना नानासाहेब सरदेसाई लिहितात की 'अबदाली गेल्यावर उगाच मागाहून अटकेपावेतो गेल्याचे दाखवून अबदालीला जास्त डिवचण्याचे श्रेय मात्र त्यांनी संपादन केले.' (पेशवा बाळाजी बाजीराव २, पृ. २९५) आणि हे अगदी खरे आहे. कारण मराठे तेथून परत आल्यावर अबदालीने पंजाबातील मराठ्यांचा अंमल साफ उडवून लावला.

कर्नाटकाप्रमाणेच
 अटकेपर्यंत मराठे गेल्यानंतर नानासाहेब पेशव्याने पंजाबच्या कामाचा सर्व अखत्यार मल्हाररावाकडे द्यावा आणि त्याला तेथेच राहण्यास सांगावे असा स्पष्ट हुकूम पाठविला होता. पण तो मल्हाररावाने मानला नाही. रघुनाथरावालाही वजीर, हिंगणे व इतर दरबारी लोक विनवीत होते की आपण या वेळी आता दक्षिणेत जाऊ नये, येथेच ठासून राहावे, म्हणजे अबदाली फिरून इकडे येणार नाही. खर्चाची सर्व तरतूद करण्याची कबुलायतही वजिराने लिहून दिली. पण दादाने ते मानले नाही. मल्हारराव आणि तो दक्षिणेत निघून गेले. आणि कर्नाटकचाच खेळ पंजाबात सुरू झाला. मराठ्यांनी फौजा घेऊन जावे, चौथाई वसूल करावी, काही व्यवस्था लावावी, अन् त्यांची पाठ फिरताच मुस्लिमांनी ती सर्व व्यवस्था उधळून लावावी. याविषयी लिहिताना शेजवलकर लिहितात, 'एवंच जेथे मराठ्यांचे सैन्य असेल तेथे तेवढे त्यांचे राज्य असे.' (नानासाहेब पेशवे- चरित्र, सरदेसाई, प्रकाशक- भारत गौरव ग्रंथ- माला, याची प्रस्तावना, पृ. १८) सर्व भारतात मराठयांच्या साम्राज्याची अशी स्थिती होती. मल्हारराव आणि रघुनाथराव पंजाबातच राहते तर अबदाली फिरून आलाच नसता आणि पानपत घडलेच नसते. पुढे सात आठ वर्षांनी शिखांनी अफगाणांशी लढून पंजाब स्वतंत्र केलाच. रघुनाथराव व मल्हारराव राहते तर ते या वेळीच घडून येते आणि हिंदुपदपातशाहीला काही अर्थ निर्माण झाला असता. पण त्या दोघांनाही हे आकलन करण्याची पात्रताच नव्हती !