पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५५५
साम्राज्याचा विस्तार
 


आसुरी संहार
 दादासाहेब आणि मराठे दक्षिणेत गेल्यावर गाजीउद्दीन पंजाबवर चालून गेला व तो प्रांत अबदालीच्या सुभेदाराकडून त्याने जिंकून घेतला. ही वार्ता ऐकून अबदाली चिडून गेला. आणि १७५६ च्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये तो पंजाबात शिरला. त्याने दिल्लीस वकील पाठवून दोन कोटी रुपयांची मागणी केली. पण बादशहा आणि वजीर यांच्याजवळ दोन लाख सुद्धा नव्हते. त्यामुळे अबदालीने दिल्लीवर धाड घातली. आणि फेब्रुवारी १७५७ पासून पुढील दोन महिन्यांत दिल्ली, आग्रा व मथुरा या शहरांत त्याने कत्तलखानाच उघडला. हजारो लोकांची मुंडकी कापून त्याने त्यांच्या राशी केल्या. २५ कोट रुपये वसूल केले आणि हजारो स्त्रियांची बेअब्रू केली. जनानखान्यातील स्त्रियांनाही त्याने वगळले नाही. या सर्व प्रकाराने त्याने नादिरशहासही लाजविले. असा भयानक आसुरी संहार करून मार्चअखेर तो स्वदेशी परत गेला.

शत्रूचे रक्षण
 अबदाली काबूलहून निघाल्याच्या वार्ता दक्षिणेत कळतच होत्या. त्याचा प्रतिकार करून पातशाहीचे रक्षण करण्यासाठी नानासाहेबाने पुन्हा रघुनाथराव व मल्हारराव होळकर यांनाच पाठविले. ते १९५६ च्या नोव्हेंबरात निघाले होते. त्यांच्या मनात असते तर १७५७ च्या जानेवारीत ते दिल्लीला सहज पोचू शकले असते. या वेळी पंजाबचे शीख व सुरजमल जाट त्यांना अनुकूल होते. महामारीच्या रोगाने अबदालीची फौज हैराण झाली होती. अशा स्थितीत त्यांनी १७५७ च्या फेब्रुवारीत दिल्लीस जाऊन धडक मारली असती तर अबदालीचा त्यांना धुव्वा उडवता आला असता. पण १६ फेब्रुवारीपर्यंत सावकाश मजला करीत राघोबा व मल्हारराव इंदुरास पोचले ! मग काही काळ राजस्थानात काढून मे महिन्यात ते आग्र्याला आणि ऑगस्टमध्ये दिल्लीला पोचले आणि तेथे गेल्यावर तरी त्यांनी काय केले ? नजीबखान हा सर्व अबदालीच्या कारभाराचा सूत्रधार होता. त्याचा प्रथम निकाल करणे अवश्य होते. पण त्याने मल्हाररावाचे पाय धरले व मल्हाररावाने त्याला धर्मपुत्र मानले. अंताजी माणकेश्वर, हिंगणे, बुंदेले या सर्वांनी सांगितले की नजिबाचा आधी निकाल करा. पण राघोबा व मल्हारराव यांनी ते मानले नाही. बखरकार सांगतात की पुढल्या वर्षी दत्ताजी शिंदे उत्तरेत आल्यावर मल्हाररावाने त्यास सांगितले की नजीब नाहीसा झाला तर पेशव्यांना शत्रू राहणार नाही. मग आपले काम काय ? पेशवे आपल्याला धोतरे बडवावयास लावतील ! दत्ताजीला हा प्रत्यक्ष विचार मानवला की नाही, हे सांगता येणार नाही. पण नजीबखानावर विश्वास ठेवून शेवटी त्याच्यामुळे तो बळी गेला, असा इतिहासच आहे. तेव्हा शत्रूला सांभाळून ठेवणे हे मराठ्यांतील एका पक्षाने कायमचे व्रत स्वीकारले होते. पुढे निजामाचा व हैदरचा पूर्ण पाडाव झाल्या-