पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५५७
साम्राज्याचा विस्तार
 


पानपतचे कारण
 रघुनाथरावाने अर्धवट टाकलेली कामे पुरी करण्यासाठी नानासाहेबाने १७५८ साली दत्ताजी शिंदे यास उत्तरेत पाठविले. जनकोजी शिंदे आधी पुढे गेलाच होता. पण दत्ताजीला नजीबखानाने अनेक महिने भूलथापा देऊन बेसावध ठेवले आणि आतून कारस्थाने करून अबदाली पुन्हा दिल्लीवर येईल अशी व्यवस्था केली. त्या वेळी झालेल्या संग्रामात दत्ताजीचा वध झाला. आणि त्यामुळेच पानपत प्रकरण उद्भवले. या युद्धात मराठ्यांचा दारुण पराभव झाला. आणि हिंदी राजकारणाला निराळेच वळण लागले. पानपतच्या अपयशातून मराठे पुढील ५-६ महिन्यांत सावरले हे खरे. पण त्यामुळे फक्त चौथाई वसूल करणे हे जे मराठी साम्राज्याचे स्वरूप ते कोणत्याही अर्थाने बदलले नाही. त्यामुळे मनात एक विचार येतो. मराठे नर्मदा ओलांडून पलीकडे कधी गेलेच नसते तर ? झाले यापेक्षा मराठी साम्राज्याचे रूप निराळे झाले असते काय ? नानासाहेब पेशव्याला शाहू महाराजांनी दोन महिने पेशवेपदावरून दूर केले होते. पण ते जबाबदारीचे पद घेण्यास दुसरा कोणीच पुढे आला नाही. त्यामुळे त्याची स्थापना त्यांनी पेशवेपदी पुन्हा केली. त्यानंतर त्याचे आसन बळकट झाले होते. तेव्हा शिंदे, होळकरादी सरदारांना उत्तरेत केव्हाही न पाठवता, सर्व दक्षिण निर्वेध करून, खरेखुरे मराठी साम्राज्य नर्मदेपासून कन्याकुमारीपर्यंत त्याने स्थापन केले असते, तर काय झाले असते ? त्या प्रचंड सामर्थ्याच्या जोरावर पुढे मागे मराठ्यांना उत्तरही निर्वेध करता आली असती. पण याची बरीच चिकित्सा केली पाहिजे. पुढील लेखात, प्रथम थोडक्यात माधवरावांच्या वेळच्या मराठी साम्राज्याचे वर्णन करू, आणि मग ही चिकित्सा करू.