पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
५५४
 

वजिराने बादशहाला वाचविण्यासाठी जनानखान्यासह त्याला सिकंदराबाद येथे नेऊन ठेविले. या वेळी वास्तविक मराठ्यांनी बादशहाचे रक्षण करणे अवश्य होते. पण ते तर त्यांनी केले नाहीच, उलट बादशहाच्या छावणीवर हल्ला करून मल्हाररावाने लूटमार केली; आणि जनानखान्यातील स्त्रिया भीतीने पळून जाऊ लागल्या, त्यांनाही लुटून त्यांचे जडजवाहीर लुबाडले. यानंतर गाजीउद्दीनाने बादशहास पदच्युत केले, तो व त्याची आई उधमबाई यांस कैद केले आणि दुसरा आलमगीर यास तख्तावर बसवून पहिल्याचा म्हणजे अहंमदशहाचा काही दिवसांनी वध केला. या सर्व प्रसंगी मराठे दिल्लीच्या आसपासच होते, पण त्यांनी बादशहाच्या रक्षणाची कसलीच काळजी वाहिली नाही !

कर्तृत्वाचा उगम ?
 दुसरे एक महत्त्वाचे कार्य त्यांना करता आले असते. पंजाबात शिरून अटकेपर्यंत जाऊन त्या प्रांताचा कायमचा बंदोबस्त करणे अवश्य होते. कारण दिल्ली ते काबूल यांमध्ये अबदालीला सरळ फौजा घेऊन येण्यास वाटेत कसलाच अडथळा नव्हता. पंजाब व सिंध या प्रांतांच्या रक्षणाची कायमची सोय केल्यावाचून दिल्लीचे रक्षण होणे कदापि शक्य नव्हते. पण रघुनाथरावाने यातले काहीच केले नाही. त्याने बऱ्याचशा तीर्थयात्रा करून पुण्य मात्र जोडले ! या वेळी नानासाहेब स्वतः स्वारीवर असते तर आग्रा व अजमीरचे राजकारण जाणून त्यांनी जाट व रजपूत यांशी वैर येऊ दिले नसते, शिंदे व होळकर यांचे वितुष्ट येऊ दिले नसते, आणि पंजाबचा प्रश्नही सोडविला असता. अंताजी माणकेश्वर, गोविंदपंत बुंदेले यांनी अनेक पत्रांतून, 'स्वामींनी स्वतः इकडे येणे अवश्य आहे' असे विनविले होते. पण नानासाहेब उत्तरेत आलाच नाही. तो आल्यावर वरील प्रकरणे सुटली असती, असे वर म्हटले आहे, त्यालाही कितपत अर्थ आहे ते सांगता येत नाही. कारण एवढी सर्व हिंदुस्थानची, दक्षिणेची, उत्तरेची, पश्चिमेची म्हणजे कोकणची आणि पूर्वेकडील बंगाल, बिहार येथली सर्व राजकारणे त्याला उमगली असती तरी त्या सर्वांना आवर घालण्याइतके कर्ते पुरुष त्याचेजवळ नव्हते. शिंदे, होळकर, भोसले, गायकवाड या सरदारांची वर्णने वर आलीच आहेत. अंताजी माणकेश्वर, गोविंदपंत बुंदेले, हिंगणे यांच्या ठायी हा वकूबच नव्हता. शिवाय या सर्वांचे आपसांत वैमनस्य होते. हिंदुपदपातशाहीची जी जबाबदारी मराठ्यांनी शिरावर घेतली होती ती पार पाडण्याइतके कर्तृत्व त्यांच्या ठायी मुळीच नव्हते. आणि ते निर्माण होणेही शक्य नव्हते. जगाचा इतिहास, भूगोल, विज्ञानाची जगातील प्रगती, व्यापार, व्यापारी संघटना, बुद्धिवादाने जगातील घडामोडींचा अभ्यास करण्याची शक्ती यावाचून हे कर्तृत्व निर्माण होत नाही.