पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५५१
साम्राज्याचा विस्तार
 

मोगल सत्ता नष्ट करून अफगाण सत्ता- रोहिले अफगाणच होते- प्रस्थापित करावयाची होती. म्हणून नादिरशहानंतर त्याच्या जागी आलेल्या अहंमदशहा अबदालीला ते नित्य बोलवीत असत. अबदालीला दिल्लीच्या तख्ताची आकांक्षा नव्हती. पण पंजाब- प्रांत कायम आपल्या ताब्यात ठेवावयाचा असा त्याचा निर्धार होता. आणि तो प्रांत दिल्लीच्या बादशहाच्या ताब्यात होता. म्हणून संधी मिळेल तेव्हा तो दिल्लीवर स्वारी करीत असे.

मराठे - संरक्षक
 साम्राज्याच्या दृष्टीने पाहता, आता दिल्लीच्या बादशहाच्या ताब्यात दिल्ली ते अटक एवढाच प्रदेश राहिला होता. नर्मदेच्या खालचा प्रदेश मराठे व निजाम यांनी व्यापला होता. गुजराथ, माळवा, बुंदेलखंड हे मराठ्यांनी जिंकले होते. बंगाल, बिहार व ओरिसा यांवर रघूजीने चौथाई बसविली होती. अशा स्थितीत बादशहाला स्वसंरक्षणाचीच चिंता होती. म्हणून, उत्तरेकडच्या प्रदेशांचे चौथाईचे हक्क देऊन, मराठ्यांनी आपले संरक्षण करावे, असा त्याने करार केला होता.

राघोबा
 दिल्लीचे बलाबल पाहिले. आता तिच्या संरक्षणाची जबाबदारी घेणाऱ्या मराठ्यांचे बलाबल पाहू. उत्तरेत दीर्घकाळ राहणारे त्यांचे प्रमुख सरदार जे शिंदे, होळकर त्यांचे वैमनस्य होते. अंताजी माणकेश्वर हा दिल्लीला फौज घेऊन नेहमी असे. आणि हिंगणे हा वकील म्हणून असे. त्यांचेही परस्परांशी पटत नसे. नानासाहेब पेशवा हा मराठी राज्याचा सूत्रधार. पण शिंदे, होळकर, आणि विशेषतः मल्हारराव होळकर त्याचे हुकूम मुळीच मानीत नसत. शाहू छत्रपतींचे इतर प्रधान त्याला जुमानीत नसत. शाहू छत्रपतींनी मृत्युसमयी त्याला मराठी राज्याचे सर्वाधिकार दिले. पण ताराबाई व इतर प्रधान निजामाशी संगनमत करून त्याला उखडून टाकण्यात सदैव तत्पर असत. त्यामुळे उत्तर हिंदुस्थानात जाण्यास तो धजावत नसे. छत्रपतींच्या मृत्यूनंतर तो एकदाही उत्तरेत गेला नाही, म्हणून नानासाहेब सरदेसाई यांनी त्याला सारखा दोष दिला आहे. ही त्याची फार मोठी चूक होय, असे त्यांनी म्हटले आहे. उत्तरेतील माणकेश्वर, बुंदेले यांच्या पत्रांत, स्वामींनी स्वतः उत्तरेत यावे, असे वारंवार पेशव्यांना लिहिलेले आढळते. पण दक्षिणेतून आपण वर गेलो, तर मागे अनर्थ होईल, अशी भीती वाटत असल्यामुळेच तो तिकडे गेला नसावा. म्हणून त्याने राघोबाला दोनदा तिकडे पाठविले. पण त्याच्याइतका नालायक माणूस दुसरा कोणी नव्हता. त्यामुळे उत्तरेच्या राजकारणाचा कायमचा विचका फक्त त्याने केला.
 दोन पक्षांचे बलाबल पाहिल्यानंतर आता प्रत्यक्ष ऐतिहासिक घडामोडींची थोडी मीमांसा करणे सुलभ होईल.