पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
५५०
 

मराठी राज्याशी म्हणजे शाहू छत्रपती आणि पेशवे यांशी सलोखा करून त्याने हा पराक्रम केला असता तर मराठी साम्राज्याला निराळे रूप आले असते. पण प्रतिनिधी, सचिव इ. प्रधानांप्रमाणे नुसतीच पेशव्याविरुद्ध गाऱ्हाणी करीत बसण्यापेक्षा रघूजीने बंगाल प्रांत कबजात आणला. हा पराक्रम अभिनंदनीय आहे यात शंका नाही. तुळाजी आंग्रे याने हेच केले असते, मूळ मराठी राज्याशी बखेडा माजविला नसता, तर कोकणात मराठी साम्राज्य दसपट दृढ झाले असते. पण मानवी स्वभाव ! किंवा नियती ! सर्वात खरी गोष्ट म्हणजे विद्या. ती येथे कोणातही नव्हती. त्यामुळे या अत्यंत प्रबळ, पराक्रमी सरदाराची शेवटची वीस वर्षे तुरुंगात वाया गेली. दमाजी गायकवाडाने आरंभीची काही वर्षे अशीच वाया घालविली. मराठी राज्यावरच त्याने स्वारी केली. पण मागून तरी त्याला सुबुद्धी सुचली. त्यामुळे गुजराथेत मराठी साम्राज्याला साम्राज्यसत्तेचे रूप तरी आले.

उत्तर हिंद
 कर्नाटक, राजस्थान, कोकण आणि बंगाल या प्रदेशांचा विचार झाला. आता उत्तर हिंदच्या राजकारणाचा विचार करावयाचा. याच राजकारणाचे पर्यवसान पानपतात झाले. म्हणून मराठ्यांच्या इतिहासात याचे फार महत्त्व आहे.

दुबळे बादशहा
 सय्यदबंधूंनी महमंदशहाला दिल्लीच्या गादीवर बसविले. तेव्हापासून दिल्लीचे बादशहा हे सतत दुबळे, नाकर्ते, कर्तृत्वशून्य असेच निघाले. अहंमदशहा, अलीगोहर, शहा अलम हे सर्व असेच होते. या काळात त्यांचे वजीर सफदरजंग, इंतज सुद्दौला, गाजीउद्दीन (धाकटा) यांची स्थिती अशीच होती. कर्ता, समर्थ, मुत्सद्दी असा यांच्यापैकी एकही नव्हता. तशातही कोणी कर्तृत्व दाखविलेच तर, हा आपल्याला गुंडाळून ठेवील, किंवा आपला घात करील, अशी बादशहाला भीती वाटत असे. त्यामुळे बादशहा आणि वजीर यांच्यात सलोखा असा कधीच नसे. एकमेकांचा घातपात करण्यास ते सदैव टपलेले असत. गाजीउद्दीनाने तर अहंमदशहा आणि त्याची आई यांना ठार मारले. या वजिरांना पैशाची नेहमी टंचाई असे. त्यामुळे व इतर कारणांमुळे त्यांचे लष्कर त्यांची वाटेल ती बेअब्रू करीत असे. त्यांना व त्यांच्या बायकांनासुद्धा रस्त्यात फरफटत शिपाई नेत. कधी कधी बादशहावरही अशी पाळी येई. अशी ही या काळात दिल्लीच्या पातशाहीची स्थिती होती.

रोहिले
 याच काळात रोहिल्यांचा उदय झाला हे मागे सांगितलेच आहे. नजीबखान हा दक्षिणेतील निजामासारखाच धूर्त व पातळयंत्री नेता त्यांना मिळाला होता. त्यांना