पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
५४४
 


रजपूत प्रकरण
 शरीरात प्राणतत्त्व आहे तोपर्यंत त्याचे भिन्न अवयव एकमेकांशी दृढपणे संलग्न असे राहतात. ते तत्त्व क्षीण झाले की अवयव विलग होऊन शेवटी तुटून पडतात. तेच समाजाचे आहे. ध्येयवाद, उच्च निष्ठा, काही तत्त्वे म्हणजेच प्राणतत्त्व होय. ते क्षीण झाले की समाज फुटू लागतो व त्याचे बळ नाहीसे होते. बाजीरावाअखेर तो व त्याने नव्याने निर्माण केलेले शिंदे, होळकरादी सरदार यांच्यात स्वामिनिष्ठा होती आणि हिंदुपदपातशाहीचे ध्येय त्यांच्या डोळ्यासमोर होते. रजपुतांना बाजीरावाने अतिशय मान दिला आणि त्यांशी सख्य राखले, याचे कारण हेच होय. पण त्याच्या नंतर हे ध्येय मनात कायम असले तरी प्रत्यक्षात राहिले नाही. आणि रजपूत हे मराठ्यांचे शत्रू बनले !

पैसा हे तत्त्व
 १७४३ साली जयपूरचा राणा सवाई जयसिंग मरण पावला. त्याला ईश्वरीसिंग व माधवसिंग हे दोन पुत्र. जयसिंगामागे ईश्वरीसिंग हा राणा झाला. पण १७४६ साली माधवसिंगाचा आजा मेवाडचा राणा जगत् सिंह याने माधवसिंगाच्या बाजूने ईश्वरीसिंगाशी युद्ध सुरू केले. ईश्वरीसिंगाने मराठयांची मदत मागितली. त्यावेळी शिंदे-होळकर तेथे होते. त्यांनी ईश्वरीसिंगास मदत करण्याचे ठरविले. बादशहानेही ईश्वरीसिंगास मान्यता दिली. पण यावेळी जगत् सिंगाने पेशव्यांकडे वकील धाडले व मोठा नजराणा करून माधवसिंगाचा पक्ष घ्यावा अशी विनंती केली. त्यावेळी नानासाहेबांनी जगत्- सिंगास निक्षून सांगावयास हवे होते की आम्ही एकदा ईश्वरीसिंगाचा पक्ष घेतला आहे, त्यात बदल होणे शक्य नाही. पण त्याने तसे केले नाही. त्यास पैशाची फार निकड होती. पैसा ही मराठी राज्याची कायमची व्यथा होती. सर्व हिंदुस्थानचा व्याप संभाळावयाचा म्हणजे फार मोठी फौज पाहिजे. तिला पैसा कधीही पुरत नसे. पण याशिवाय मोठे कारण म्हणजे शाहू छत्रपतींचा खर्च. त्यांच्या खर्चाला सुमारच नसे. आणि सगुणाबाई व सकवारबाई या त्यांच्या राण्यांना कर्ज किती करावे याची काही मर्यादाच राहिली नव्हती ! त्यामुळे शाहूछत्रपती नेहमी पेशव्यांच्या मागे पैशाचा लकडा लावीत. पैशांची विवंचना नाही, असे या पेशव्यांचे एकही पत्र आढळणार नाही. अहोरात्र पैशाची चिंता ! त्यामुळे माधवसिंग बराच नजराणा करतो हे पाहून, त्याने त्याचा पक्ष घ्यावा असे ठरविले. येथे हिंदुपदपातशाहीही संपुष्टात आली. रजपुतांना मिळवून घ्यावयाचे आहे, हे धोरण संपले. जो पैसा जास्त देईल त्याकडे मराठे जाणार, त्यांना तत्त्व, ध्येय काही नाही, असा त्यांचा दुलौकिक झाला. होळकरानेही यावेळी मूळपक्ष सोडला आणि तो माधवसिंगाला मिळाला. यामुळे शिंदे- होळकरांचे कायमचे वाकडे येऊन पुढे पानपतावर आणि उत्तरेच्या राजकारणात कायमचा बिघाड झाला.