पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
५४२
 

घेऊन त्यास अर्काटचा नवाब केले आणि चंदासाहेबास कैद करून साताऱ्यास आणून ठेविले. त्यामुळे संतुष्ट होऊन, शाहूमहाराजांनी वऱ्हाड, गाेंडवण, बंगाल इ. पूर्वकडच्या प्रांतांची कामगिरी त्याला सांगून त्याच्या सनदाही दिल्या.

सर्व व्यर्थ
 हा पराक्रम मोठा झाला. पण त्याचे पुढे काय ? यावेळी प्रथम बाजीराव उत्तरेत होता. तिकडेच तो मृत्यू पावला. त्यानंतर नानासाहेब पेशवा झाला आणि तो माळव्यावर निघून गेला आणि रघूजी पण नागपुराकडे निघून गेला. हे पाहताच सर्व सैन्य घेऊन निजाम कर्नाटकात उतरला (१७४३ मार्च). त्याने अन्वरुद्दिन हा नवीन माणूस अर्काटचा नवाब म्हणून नेमला. एवढी सेना पाहून कडप्पा, बेदनूर, सावनूर येथले नवाबही भयभीत झाले आणि निजामापुढे वाकले आणि अशा रीतीने मराठ्यांचा दोन वर्षांचा उद्योग निजामाने दोन महिन्यात सर्व व्यर्थ करून टाकला.

महत्त्वाचे कारण
 कर्नाटकाचा सुभा शाहू छत्रपतींनी फत्तेसिंग भोसले आणि त्याचा स्नेही बाबूजी नाईक यांच्याकडे सोपविला होता. पण ते दोघेही नाकर्ते, दुबळे होते. या बाबूजी नाईकाला पेशवेपदाची हाव होती आणि रघूजी भोसल्याचा त्याला पाठिंबा होता. पण ती त्याला न मिळाल्यामुळे त्या दोघांनी नानासाहेबांशी कायम वैर धरले. निजामाने कर्नाटकात सर्व विध्वंस केल्यावर बाबूजीला चांगली संधी होती. त्याला तशी घमेंडही होती. म्हणून तिकडील देसाई, नवाब यांच्याकडून वार्षिक खंडणी गोळा करण्यासाठी तो गेला. पण त्या देसायांनी व संस्थानिकांनी याचाच मोड करून त्यालाच लुटले आणि फौजेच्या निमित्ताने बाबूजीला कर्ज मात्र भरमसाट झाले. आणि मौज अशी की त्या कर्जाचे निवारण करावे, म्हणून तो छत्रपतींच्याच दाराशी धरणे धरून बसला ! अशा वेळी छत्रपतींनी त्याच्याकडून कर्नाटकचा सुभा काढून घेऊन त्याला वास्तविक हाकलून द्यावयाचे. पण तसा कडवेपणा त्यांच्या अंगी नव्हता. यशवंतराव दाभाडे गुजराथचा कारभार करीना. तो व्यसनाधीन होऊन पडून असे. तरी तो सुभा महाराजांनी त्याच्याकडून काढला नाही. बाबूजी नाइकाकडून कर्नाटक काढला नाही. मराठ्यांच्या राज्याला व साम्राज्याला सामर्थ्य असे कधीच प्राप्त झाले नाही, त्याच्या अनेक कारणांपैकी हे एक आहे.
 पुढे १७४८ साली निजाम मृत्यू पावला, तेव्हा त्याचे मुलगे आणि नातू मुजफर जंग यांच्यांत भांडणे लागली. तेव्हा मराठ्यांच्या व फ्रेंचांच्या मदतीने, चंदासाहेब आणि मुजफरजंग यांनी अन्वरुद्दिन यास ठार मारले. आणि मुजफरजंग निजाम झाला व चंदासाहेब अर्काटचा नवाब झाला. याच वेळी अन्वरुद्दिन याचा एक मुलगा महंमद अल्ली हा इंग्रजांकडे गेला. तेव्हा कर्नाटकात इंग्रज आणि फ्रेंच यांचे द्वंद्व उभे राहिले.