पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५४१
साम्राज्याचा विस्तार
 

तर दाभाडे, गायकवाड हे मराठे सरदारही हेच करीत असत. हे सर्व ध्यानी घेऊनच आपण 'मराठी साम्राज्य' हा शब्द वापरला पाहिजे.

हुकमत नाही
 याची कारणे अनेक आहेत. त्यांचा विचार आपल्याला त्या त्या प्रकरणात करावयाचा आहेच. पण मुख्य कारण एकच की मराठे एका हुकमतीत कधीच वागत नसत. प्रत्येकाचा सुभा स्वतंत्र असे. तो त्यांना शाहू छत्रपतींनी दिलेला असला तरी त्यांच्या आज्ञाही ते कधी पाळत नसत. आणि एकमेकांच्या प्रांतातही, हवी तेव्हा, हवी तशी लुटालूट, जाळपोळ, करीत असत. ताराबाई ही नानासाहेब पेशव्याचा मुख्य शत्रू होती. प्रतिनिधी, सचिव, मंत्री, अमात्य, दाभाडे, रघुजी भोसले, गायकवाड, यमाजी शिवदेव, पिलाजीचा मुलगा जोत्याजी जाधव, गोविंदराव चिटणीस, कदमबांडे, हे सर्व सर्व नानासाहेब पेशव्यांचे शत्रू होते. ताराबाई यांना चिथावून देई. ते निजामाला जाऊन मिळत. आणि मराठी राज्याचे शक्य ते नुकसान करीत. यांपैकी अनेकांना, तुम्ही पेशवेपद घ्या, असा शाहू महाराजांनी आग्रह केला होता. एकदा तर नानासाहेबाला त्यांनी दोन महिने पेशवे पदावरून दूरही केला होता. त्यावेळी पेशवेपद स्वीकारण्यास कोणीही पुढे आला नाही. तरी शाहू छत्रपतींचे, पेशव्यांचे म्हणजेच मराठ्यांचे राज्य नीट चालू द्यावयाचे नाही, असा जणू काय त्या प्रत्येकाचा निर्धार होता. सर्व मराठे एक असते, त्या सर्वांना एका हुकमतीत वागविणारे छत्रपती त्यांना लाभले असते, तर हिंदुपद पादशाहीचे शिवछत्रपतींचे ध्येय निश्चित साध्य झाले असते. पण तसे झाले नाही. या सरदारांपैकी कोणालाही कसलीही निष्ठा नव्हती. धर्मनिष्ठा नाही, राष्ट्रनिष्ठा नाही, स्वामीनिष्ठा नाही. अशा स्थितीत नानासाहेब पेशव्याने साम्राज्याचा जो काही विस्तार केला तोच त्याचा विशेष पराक्रम होय, असे सरदेसाई म्हणतात, ते अगदी खरे आहे.

कर्नाटक
 आता १७४० ते १७६१ या एकवीस वर्षांच्या काळात नानासाहेबांच्या कारकीर्दीत मराठ्यांच्या साम्राज्याचा विस्तार कसा कसा झाला ते इतिहासक्रमाने न पाहता एकेका प्रदेशाच्या हिशेबाने पाहू. तशानेच या साम्राज्याची सम्यक कल्पना येईल. १७४० साली तंजावरच्या गादीवर प्रतापसिंह भोसले हा आला. तो दुबळा होता. यावेळी अर्काटच्या नबाबाचा जावई चंदासाहेब फार प्रबळ होता. तो तंजावर आक्रमिणार, असा सुमार दिसू लागला. तेव्हा छत्रपती शाहू यांनी फत्तेसिंग भोसले आणि नागपूरचा सेनासाहेब सुभा रघूजी भोसले यांस त्यावर पाठविले. यावेळी रघूजीने मोठा पराक्रम केला. त्याने अर्काटचा नवाब दोस्त अल्ली यास ठार मारले, त्याच्या सैन्याची धूळधाण केली, नवाबाचा मुलगा सफ्दर अल्ली याच्याकडून एक कोट रुपये