पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



२८.
साम्राज्याचा विस्तार
 



साम्राज्याचे स्वरूप
 'स्वराज्याचे साम्राज्य' असा मागल्या लेखाचा मथळा होता आणि 'साम्राज्याचा विस्तार' असा याचा आहे. पण साम्राज्य या शब्दाचा अर्थ आपण नीट समजावून घेतला पाहिजे. आज साम्राज्य शब्दाला जो रूढ अर्थ आहे त्या अर्थाने मराठ्यांचे साम्राज्य भारतात कोठेच नव्हते. प्रथम दक्षिणच्या सहा सुभ्यांत त्यांनी चौथाईचे व सरदेशमुखीचे हक्क मिळविले. तसेच हक्क पुढे माळवा, बुंदेलखंड व राजस्थानचा काही प्रदेश येथे त्यांनी मिळविले. त्यानंतर नानासाहेबांच्या कारकीर्दीत आग्रा, मुलतान, प्रयाग, बंगाल, बिहार, ओढ्या, पंजाब या प्रदेशात अशाच प्रकारचे हक्क त्यांना मिळाले. मराठ्यांच्या साम्राज्याचा विस्तार तो हाच. पण राज्याचा बंदोबस्त, संरक्षण, व्यवस्थित सारावसुली, व्यापार, शेती यांचे संरक्षण आणि सर्व सार्वभौम सत्ता या अर्थी मराठ्यांचे साम्राज्य वरीलपैकी एकाही प्रांतात नव्हते. चौथाईबरोबर येणारी कर्तव्ये म्हणजे प्रदेशाचे संरक्षण, बंदोबस्त व लोकांचे संरक्षण हेही मराठयांना कोठे करता आले नाही. वरील प्रदेशात त्यांना चौथाईचे हक्क मिळाले हे खरे. पण लष्कर घेऊन गेल्याखेरीज कोठेही केव्हाही त्यांना पैसा वसूल करता आला नाही. शांतता व सुरक्षितता ही महाराष्ट्रात, जेथे त्यांचे स्वराज्य होते त्या भागातसुद्धा, निर्वेध चालली होती असे नाही. निजामादी त्यांचे शत्रू येथे येऊन लुटालूट, जाळपोळ करीत असेच नव्हे,