पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५३९
स्वराज्याचे साम्राज्य
 

माळवा प्रांत देणे, नर्मदा व चंबळ यांतील सर्व मुलूख देणे, मराठ्यांच्या खर्चाने ५० लाख देणे, अशा तहाच्या अटी होत्या. ७ जानेवारी १७३८ रोजी निजामाने सह्या केल्या व अडीच तीन वर्षे चाललेले हे मराठ्यांचे युद्ध संपले. सर्व भारतात मराठे अजिंक्य ठरले आणि स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर झाले.

छत्रपतींचा विरोध
 हे जे साम्राज्य झाले त्याचा पाया याच वेळी जास्त दृढ आणि व्यापक असा करता आला असता. निजामाचा कायमचा नाश करणे या वेळी सहज शक्य होते. बाजीरावाचे कर्तृत्व व त्याने निर्माण केलेले नवे कर्ते पुरुष यांना हे सहज शक्य होते. पण शाहू छत्रपती यांचा याला सक्त विरोध होता. पालखेडनंतर बाजीरावाचा निजामाला नेस्तनाबूद करण्याचा मनसुबा होता. पण छत्रपतींनी त्यास लिहिले की 'नबाबाचा व स्वामीचा सल्ला आहे. तेव्हा भागानगराकडे स्वारीस जाऊ नये.' पुन्हा खानदेशात निजाम शिरला असता बाजीरावाने तसाच विचार केला होता. पण शाहू- महाराजांनी कठोरपणे त्याला लिहिले की 'तुम्ही नबाबाचे नजीक राहू नये. त्यांच्या स्नेहास अंतर करू नये.' महाराजांनी आज्ञापत्र लिहून शपथपूर्वक आज्ञा केली की नबाबाची मर्जी राखावी. कै. नानांच्या पायाची शपथ सांगितली. नबाबाशी कलह न केला पाहिजे. (पे. द. उतारा, सरदेसाई, पेशवा बाजीराव, पृ. ११०).
 या वेळी निजामास पूर्ण गारद केला असता तर सर्व दक्षिण लवकरच मराठ्यांना निर्वेध करता आली असती. पण मराठा छत्रपतींचाच त्याला विरोध होता.

पातशाहीचे रक्षण
 दुसरे शाहू छत्रपतींचे घातकी धोरण म्हणजे त्यांची दिल्लीच्या बादशहाविषयीची भक्ती. पातशाहीचे रक्षण करणे हे ते आपले कर्तव्य मानीत. औरंगजेबाच्या मुलीने त्यांचा संभाळ केला होता. म्हणून ते तिला मातृस्थानी व तिच्या बंधूंना मातुलस्थानी मानीत असत. तेव्हा 'मातृस्थानी विरोध करणे कामाचे नाही, असे मनात येऊन बादशहाची स्वस्थता राखून सपूर्ण सत्ता वागवावी हा इरादा मनातील' शाहू महाराज बादशाहीला शिवमंदिर मानीत, तेव्हा नवे मंदिर उभारण्यापेक्षा जुन्याचा जीर्णोद्धार करणे त्यांना जास्त पसंत होते (पृ. ३३३, ३३४).
 शाहूछत्रपतींच्या या धोरणाचा विचार मराठयांच्या साम्राज्याचा विचार करताना कायम मनात ठेवणे अवश्य आहे.