पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५३१
स्वराज्याचे साम्राज्य
 

फुटीर वृत्ती, बेशिस्त वर्तन आणि निखालस निष्ठाशून्यता ही लक्षात घेता, मुस्लिम सत्ताधीश माळव्यामुळे संतापणे जितके स्वाभाविक होते, तितकेच मराठे सरदार संतापणे हेही स्वाभाविकच होते असे म्हणावेसे वाटते.

निजामाची विश्रांती
 मराठयांच्या या वृत्तीचा फायदा घेण्यास निजाम सदैव टपलेलाच होता. मराठ्यांच्यात जेथे फूट दिसेल तेथे पाचर मारून, भेदनीतीचा अवलंब करून, त्यांचे सामर्थ्य खच्ची करण्याचे निजामाने व्रतच घेतले होते. आणि पुढील निजामांनी मराठ्यांच्या सत्तेच्या अखेरीपर्यंत ते काम चालवले होते. निजाम नसता, किंवा वेळीच व्यंकोजीराम या वकिलाने म्हटल्याप्रमाणे, 'निजामाची बाजीरावांनी विश्रांती केली असती', तर मराठी साम्राज्याचा विस्तार झाला यापेक्षा कितीतरी जास्त झाला असता...पण तसे झाले नाही. असो. पालखेडला पूर्ण पराभव झाल्यामुळे या वेळी निजामाला उघडपणे लष्करी हालचाल करणे जरा धोक्याचे वाटले. म्हणून त्याने संभाजी राजे व सेनापती दाभाडे यांना शाहू छत्रपतींच्या विरुद्ध उठविले आणि त्यांचे राज्य समूळ नष्ट करण्याचा डाव टाकला.

वारणेचा तह
 संभाजीराजांचा या वेळी उदाजी चव्हाण हा मुख्य साह्यकर्ता होता. निजामाच्या पाठिंब्याने आणि चव्हाणाच्या बळावर त्यांनी शाहू छत्रपतींवर स्वारी करण्याचेच ठरविले. मग मात्र संभाजीराजांचा पक्का बंदोबस्त करण्याचे छत्रपतींनी ठरविले आणि स्वारीची तयारी केली. या वेळी त्यांनी प्रतिनिधीस ही कामगिरी सांगितली आणि शंभुसिंग जाधव - चंद्रसेनाचा मुलगा- याला त्याच्या हाताखाली दिले. ही स्वारी पन्हाळे भागावर झाली. प्रतिनिधीने या वेळी यश चांगले मिळविले. संभाजी व उदाजी यांचे सर्व लष्कर लुटून फस्त केले; हजारो लोक पाडाव केले आणि ताराबाई, राजसबाई, संभाजीराजांच्या स्त्रिया, भगवंतराव अमात्य आणि व्यंकटराव घोरपडे यांना कैद केले. इतके झाल्यावर संभाजीराजांना शरण येणे भागच पडले. त्याप्रमाणे ते शरण आल्यावर छत्रपती व राजे यांच्यात तह ठरला. तो वारणेचा तह म्हणून प्रसिद्ध आहे. वारणेचा मुलूख छत्रपतींनी राजांना दिला व पुन्हा मराठी राज्यात हस्तक्षेप करणार नाही असा करार त्यांच्याकडून लिहून घेतला.

अस्तनीतील निखारे
 छत्रपतींच्या स्वभावातील एक वैगुण्य येथे ध्यानात घेतले पाहिजे. ते स्वभावाने फार मृदू होते, कनवाळू होते. बंडखोर, अपराधी, स्वामिद्रोही यांना त्यांनी कठोर अशी शिक्षा कधी केलीच नाही. त्यामुळे त्या त्या विरोधी शक्ती अस्तनीतील निखाऱ्या-