पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
५३२
 

प्रमाणे कायम राहिल्या. कोल्हापूरला संभाजीराजांच्या बाबतीत हेच झाले. तहा- अन्वये त्यांना स्वतंत्र राज्य दिलेले नव्हते. ती एक जहागीर होती. पण हळूहळू कोल्हापूरला स्वतंत्र सवत्या सुभ्याचे रूप आले आणि मराठी राज्याची शक्ती कायमची द्विधा होऊन बसली.

सेनापतीची दुर्बुद्धी
 दाभाड्यांच्या बाबतीत असेच घडले. खंडेराव दाभाडे हा मोठा पराक्रमी पुरुष. त्याचा पराक्रम पाहून शाहूछत्रपतींनी त्याला १७१७ साली सेनापती नेमले आणि गुजरात प्रांत त्याच्याकडे दिला. तेथे प्रथम त्याने व पुढे तो आजारी झाल्यावर त्याचा सरदार पिलाजी गायकवाड आणि त्याचा मुलगा त्रिंबकराव यांनी चांगली कामगिरी केली. पण १७२० नंतर बाजीरावाचा झपाट्याने उत्कर्ष होऊ लागला. त्याच्या पराक्रमामुळे शाहू छत्रपती त्याला फार मान देऊ लागले. यामुळे सर्व प्रधानांना व सेनापतीलाही त्याचा मत्सर वाटू लागला. याविषयी मागे लिहिलेच आहे. बाजीराव हा कालचा वीस वर्षांचा पोर. आपल्याहून श्रेष्ठपदी जातो याचा मत्सर वाटणे साहजिक होते. पण त्यापेक्षा आपण जास्त पराक्रम करून दाखविणे हा त्यावर उपाय होता. शाहूछत्रपती तसा अवसर प्रत्येकाला देत होते. कर्नाटकच्या स्वारीत त्रिंबकराव होताच. तरी बाजीरावावाचून स्वारी पुढे जाईना. असे झाले तरी बाजीरावाशी या मोठया सरदारांनी वैर धरावे, हे मराठ्यांचे दुर्दैव होय.
 गुजराथ प्रांत त्यांना नेमून दिलेला असताना दाभाडे व गायकवाड मावळ, कल्याण, भिवंडी या भागात व माळव्यात म्हणजे पेशव्याच्या मुलखात घुसून लुटालूट करीत, खानदेश, बागलाण या मुलखातही घुसत. छत्रपतींनी त्यांची अनेक वेळा कानउघाडणी केली. पण त्याचा कधीच काही उपयोग झाला नाही. त्यांनी बाजीरावांशी कायम तेढ धरली. बाजीरावाची या बाबतीतली भूमिका निराळी होती. छत्रपतींनी सर्व भरीभार त्याच्यावर टाकला होता. त्यामुळे कोणा सरदाराला प्रांत वाटून दिला तरी त्या प्रांताशी पेशव्याचा संबंध कायम राहावा असे त्याचे मत होते. आणि राज्याच्या एकसूत्रतेच्या दृष्टीने ते योग्यच होते. या दृष्टीने सेनापती दाभाडे यास पेशव्याने सांगितले की माळवा भागाचा निम्मा वसूल आम्ही तुम्हांला देतो, गुजराथचा निम्मा तुम्ही आम्हांला द्यावा. पण निंबाळकर दाभाडे याला ते मान्य झाले नाही. पेशव्याच्या मुलखात लूटमार करण्याचे त्याने थांबविले नाही. त्यामुळे पेशव्याने गुजराथेतही उदाजी पवार व पिलाजी जाधव यांना चौथाईच्या वसुलीसाठी पाठविले.
 यातूनच सेनापती दाभाडे व पेशवा बाजीराव यांची दुभईची लढाई उद्भवली. निजाम वरील सर्व हालचालींवर लक्ष ठेवून होता. दाभाडे व पेशवा यांच्यातील तेढ तीव्र झालेली पाहताच त्याने पाऊल उचलले आणि गुजराथकडून दाभाडे व खान-