पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
५३०
 

किंवा बुंदेलखंडातील रजपूत यांनी मराठ्यांच्यासारखी संघशक्ती कधी निर्माण केली नाही आणि मोगल पातशाहीविरुद्ध स्वतःच्या बळावर कधी उठाव केला नाही. पण बाजीरावाच्या पराक्रमाच्या वार्ता ऐकून त्यांना आता जोम आला, उत्साह आला आणि ते मराठ्यांना सामील होऊन बादशाही बुडवू लागले. तेव्हा महमंद खान बंगष त्यावर चालून आला आणि जैतपूरच्या लढाईत त्याने छत्रसालाचा पराभव केला. याच वेळी चिमाजी आप्पाच्या विजयाच्या वार्ता छत्रसालाच्या कानावर आल्या व त्याने आपला वकील दुर्गादास यास बाजीरावाकडे पाठवून मदतीची याचना केली. बाजीराव तिकडे निघालाच होता. त्याला आता अधिकच जोर चढला. त्याने त्वरेने येऊन बंगषाला वेढा घातला आणि अन्नपाणी काटून त्याचे नरडे आवळले. १७२९ च्या मे महिन्यात ही लढाई झाली. बंगषाच्या मदतीला बादशाही सरदार आले होते. पण वाटेतच मराठ्यांनी त्यांना धुळीस मिळविले. त्यामुळे बंगषाला शरणागती पत्करण्यावाचून गत्यंतरच राहिले नाही.

नवे कर्तृत्व
 असे हे दोन फार प्रचंड व निर्णायक विजय मिळवून बाजी- चिमाजी परत आले. पालखेडच्या व या स्वारीत राणोजी शिंदे, मल्हारराव होळकर, पिलाजी जाधव, उदाजी पवार हे प्रमुख आणि बाजी भीवराव रेठरेकर, गणतपराव मेहेंदळे, अंताजी माणकेश्वर, नारो शंकर, गोविंद बल्लाळ खेर, तुकोजी पवार, दावलजी सोमवंशी, असे अनेक नवे कर्ते पुरुष उदयास आले. त्यांच्या कर्तृत्वावरच पुढचा साम्राज्यविस्तार झालेला आहे.

मराठ्यांची वृत्ती
 माळवा, बुंदेलखंड यांवरील अपूर्व विजयामुळे मराठी सत्तेची हद्द यमुनेला जाऊन मिळाली त्यामुळे समस्त यावनी मंडळास मोठी दहशत बसली. बादशहास तर वाटू लागले की बाजीराव आता दिल्लीवर येतो. आणि पुढे सात आठ वर्षांनी हा पेशवा दिल्लीवर चालून गेलाच होता; त्यावरून ही भीती निराधार होती असे नाही. मराठ्यांच्या एका वकिलाने त्या वेळी लिहिलेच की 'रायांचा पुण्यप्रताप ऐसा जाला आहे की हस्तानापूरचे राज्य घेऊन छत्रपतीस देतील तर आज अनुकूल आहे.' बादशहाप्रमाणेच निजामही धसकून गेला. बादशहाबद्दल त्याला मुळीच निष्ठा नव्हती. पण दिल्लीला मोगल, मुस्लिम पातशाही राहिली पाहिजे आणि हिंदूंचा सर्वत्र पाडाव झाला पाहिजे अशी त्याची प्रबळ आकांक्षा होती. आणि दिल्ली पडली तर आपले राज्यही जाईल ही भीती त्याला होतीच. बादशहा आणि निजाम याप्रमाणे हादरले आणि संतप्त झाले तर ते स्वाभाविक होते. पण बाजीरावाच्या या पराक्रमामुळे संभाजी राजे व सेनापती दाभाडे हेही संतापून उठले ही दुर्दैवाची गोष्ट होय. पण मराठ्यांची