पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५२९
स्वराज्याचे साम्राज्य
 


हिंदू नेता
 अर्थात मोगल पातशहा आणि त्याचे सरबुलंदखान, महंमदखान बंगष इ. सरदार यांचा या मराठा आक्रमणास सक्त विरोध होता, हे उघडच आहे. त्यांच्याप्रमाणेच निजामाचाही विरोध होता. त्याची स्वतःची आकांक्षा दक्षिणेपुरतीच होती हे खरे. पण मराठे प्रबळ झाले तर पुढे आपल्याला भारी पडतील हे त्याला दिसत होते. म्हणून शक्य तेथे तो त्यांच्याविरुद्ध कारस्थाने करीत असे. पण या वेळी माळव्यात रजपूत सरदार आणि लोक मराठ्यांना अनुकूल होते. सवाई जयसिंग हा तर मराठ्यांना पूर्ण अनुकूल होता. आणि त्यानेच बाजीरावास बोलावून घेऊन ही स्वारी करविली, असे काही पंडितांचे मत आहे. मंडलोई, अनूपसिंग या सरदारांनी तर बाजी- चिमाजीस प्रत्यक्ष साह्यच केलं. कारण मोगली अंमल लोकांना असह्य झाला होता. गिरिधर बहाद्दूर व दया बहाद्दूर या दोन बादशाही अंमलदारांनी प्रजेला अगदी पिळून काढले होते. त्यामुळे सरदारांप्रमाणेच प्रजाजनांनीही मराठ्यांचे स्वागतच केले. याच कारणाने नानासाहेब सरदेसाई यांनी या युद्धाला रजपूत व मराठे यांचे मोगलांविरुद्ध धर्मयुद्ध असे म्हटले आहे. यावरून कर्नाटकातील युद्धाप्रमाणेच हे माळव्यातील युद्धही हिंदुपदपादशाहीच्या स्थापनेसाठीच होते, हे स्पष्ट दिसते. पेशवा बाजीराव याचा, शिवछत्रपतींच्या नंतरचा हिंदूंचा मोठा पुरस्कर्ता, असा गौरव सर्वत्र झाला, तो याच कारणाने.
 माळवा बुंदेलखंड या स्वारीत उदाजी पवाराचे फार मोठे साह्य झाले. बाजीरावाच्या आज्ञेवरून तो १७२२ पासून माळव्यात संचार करीत होता. १७२४ साली त्याने धारला आपले ठाणेही वसविले. आणि तेथून तो गुजराथ, काठेवाड, मारवाड, बुंदी, कोटा, बुंदेलखंड एवढ्या टापूत संचार करीत असे.

अद्भुत पराक्रम
 कंठाजी कदम हा माळव्यात उपद्रव करीत होता. त्याच्यावर गिरिधर बहादूर हा मोगल सुभेदार चालून गेला तेव्हा तो पळून गेला. तेव्हा बहादुराने अमझेरा येथे मुक्काम केला. येवढ्यात चिमाजी आप्पा आणि उदाजी पवार २२ हजार फौजेनिशी त्यावर चालून गेले. २२ नोव्हेंबर १७२८ रोजी मोठी लढाई होऊन गिरिधर व दया- बहादूर ठार झाले. मराठ्यांची फत्ते झाली. आणि क्षणभर सर्व हिंदुस्थान हादरले. मराठ्यांचा हा पराक्रम अद्भुत असाच होता.
 याच वेळी बुंदेलखंडावर झडप घालून बाजीरावाने महंमदखान बंगष या दुसऱ्या बादशाही सरदारास खटा केले. बुंदेले हे रजपूतच होते. त्यांचा राजा छत्रसाल हा पराक्रमी होता. तो शिवछत्रपतींना भेटल्याचे मागे सांगितलेच आहे. पण त्यानंतर बुंदेल्यांनी विशेष पराक्रम केला नव्हता. ही एक मोठी खेदाची गोष्ट आहे की राजस्थानातील
 ३४