पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
५२८
 

चौथाई देण्यास आम्ही तयार आहो. बहादुरशहाने ताराबाईच्या बाबतीत शाहूराजांना हेच सांगितले होते. तोच डाव निजामाने पुन्हा टाकलेला पाहून महाराज संतापले आणि त्यांनी लगोलग पेशवा बाजीराज यास कर्नाटकातून परत बोलाविले.

पालखेड
 आणि मग १७२७ च्या दसऱ्यापासून १७२८ च्या फेब्रुवारीपर्यंत बाजीराव आणि निजाम यांची प्रचंड लढाई झाली. दोघांनी एकमेकांच्या प्रदेशात प्रचंड विध्वंस व संहार केला. पण शेवटी बाजीरावाने १७२८ च्या फेब्रुवारीत पालखेडजवळ निजामाचा पुरा कोंडमारा केला, तेव्हा त्याची रग जिरली व शरण येऊन त्याने, संभाजीस शाहू महाराजांच्या स्वाधीन करावे आणि दक्षिणेच्या सहा सुभ्यांवर मराठयांचे हक्क सुरळीत चालू द्यावे, या अटी मान्य केल्या. मराठयांच्या इतिहासात ही लढाई फार प्रसिद्ध आहे. कारण त्या लढाईने मराठ्यांचा सर्वात मोठा शत्रु नामोहरम झाला, बाजीराव पेशव्याचा पराक्रम जगाला दिसून आला, शिंदे, होळकर, पवार इ. त्याच्या सरदारांची कर्तबगारी लोकांच्या प्रत्ययास आली आणि मराठी साम्राज्याचे भवितव्य ठरले. अत्यंत विस्कळित, विघटित, फुटीर अशा मराठा समाजातून मोठमोठ्या शत्रुवरही मात करणारी सांघिक शक्ती निर्माण करणारा एक नवा पुरुष उदयास आला आहे याची समज त्या दिवशी सर्व हिंदुस्थानला मिळाली.

माळवा
 माळवा आणि बुंदेलखंड हे प्रदेश चिमाजी बाजीरावांनी जिंकले, तेव्हा या नव्या सामर्थ्याचा सर्वांना पुन्हा एकदा प्रत्यय आला. पालखेडची लढाई निजाविरुद्ध होती. तर अमझेरा आणि जैतपूर येथील लढाई दिल्लीच्या मोगल बादशहाचे मोठे पराक्रमी सरदार यांच्या विरुद्ध होती. त्यामुळे माळव्यातील विजय सर्व हिंदुस्थानात फार दुमदुमला. या लढायांची वर्णने येथे देण्याचा विचार नाही. त्याचे कारणही नाही. त्या वेळच्या राजकीय पटावरील भिन्न भिन्न शक्ती कोणत्या होत्या, त्यांच्यामागे प्रेरणा कोणत्या होत्या, मराठ्यांच्या मार्गात अडसर कोणते होते, नवे कर्तृत्व कोणते उदयास आले, हे सर्व पाहून यशापयशाची मीमांसा आपल्याला करावयाची आहे.
 महाराष्ट्रात स्वातंत्र्ययुद्ध चालू होते, तेव्हा मराठे सरदार मधूनच नर्मदा पार होऊन गुजराथ, माळवा, बुंदेलखंड या प्रदेशात मुसंडी मारीत असत. या सर्व प्रांतांतून आपल्याला चौथाई वसूल करावयाची आहे, हा विचार त्यांच्या मनात तेव्हापासून पक्का रुजलेला होता. शाहू छत्रपतींची सत्ता स्थापन झाल्यावर त्यांनी वरील प्रदेशात आपले सरदार पाठविण्यास योजनापूर्वकच प्रारंभ केला.