पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५२५
स्वराज्याचे साम्राज्य
 

धनी आपणच, अशी त्यांची भावना होती. वास्तविक, शाहुछत्रपतींनी या बाबतीत त्यांच्याशी शक्य ती तडजोड करण्याचा प्रयत्न केला होता. तुम्ही पराक्रम करा, पराक्रमी माणसे हाताशी घ्या, मोगली प्रदेश जिंकून घ्या, आम्ही तसाच उद्योग करू आणि आमच्यातला निम्मा वाटा तुम्हांला देऊ, तुमच्यातला निम्मा वाटा आम्हांला द्या, असे छत्रपतींनी संभाजी राजांना अनेक वेळा विनविले होते. पण त्यांच्या ठायी ती कर्तबगारी नव्हती. दाभाडे, कदम, उदाजी चव्हाण असे अनेक सरदार शाहूचे राज्य बुडवून संभाजी राजांना गादीवर आणण्याची भाषा बोलत. पण त्यासाठी ते निजामाचा आश्रय करीत. वास्तविक याची काय गरज होती ? एवढे सरदार संघटित झाले असते तर त्यांच्या साह्याने निजामाला आणि कर्नाटकातील नबाबांना सहज रगडून काढता आले असते. आणि मराठयांचे स्वतंत्र राज्यच स्थापिता आले असते. पण संभाजीराजांना किंवा त्या सरदारांना तसली काही आकांक्षाच नव्हती. म्हणून त्या त्या वेळेच्या लहरीप्रमाणे ते एका पक्षाच्या बाजूने दुसऱ्याच्या मुलखात धुमाकूळ माजवीत आणि लूटमार करून पैसा जमवीत. यामुळे यातील बहुतेक सरदारांचे कर्तृत्व, त्यांची गुणसंपदा वाया गेली, आणि त्यांची बंडखोरी शमविण्यात शाहूछत्रपती आणि पेशवे यांची निम्मी शक्ती वाया गेली.

कर्तृत्वशून्य प्रधान
 भारतभर भिन्नभिन्न प्रदेशांत सत्ताधारी असलेले मुस्लिम सुभेदार, सरदार, नबाब ही मराठी साम्राज्यविरोधी अशी पहिली शक्ती. या सरदारांना फितूर होऊन शाहू- छत्रपतींना बुडविण्यास सज्ज होणारे मराठा सरदार ही दुसरी शक्ती. तिसरीही अशीच एक शक्ती होती. ती म्हणजे शाहू छत्रपतींचे प्रतिनिधी, अमात्य, सुमंत, मंत्री, सेनापती इ. पेशव्याला पाण्यात पाहणारे प्रधान. हे सर्व पिढीजाद लोक होते आणि त्यांच्या मते, पेशवा म्हणजे कानामागून आलेला एकोणीस वीस वर्षांचा पोरगा ! त्याला हे सर्वात महत्त्वाचे पद दिले, याचे त्यांना वैषम्य वाटत असे. ते त्याच्या मत्सराने जळत असत. असा मत्सर वाटणे हे अगदी स्वाभाविक आहे. पण एक तर छत्रपतींनी एकदा नेमणूक केल्यानंतर राज्याची शिस्त म्हणून सर्व प्रधानांनी व सरदारांनी मान देणे अवश्य होते. पण शिस्त ही कल्पनाच मराठा सरदारांना मान्य नव्हती. एकदा आज्ञा झाल्यानंतर स्वार्थ, मानापमान, मत्सर सर्व बाजूस ठेवून, सर्वांनी आज्ञेप्रमाणे एकजुटीने कार्य केले पाहिजे, हा जो कोणतीही संस्था चालण्यास अवश्य असलेला गुण तो मराठ्यांच्या अंगी कधी बाणलाच नाही. त्यामुळे पेशव्याविरुद्ध या प्रधानांनी कायम आघाडी उघडलेली होती.

पेशव्यांचा मत्सर
 पण पेशव्याशी दावा धरूनही या प्रधानांना मराठी सत्तेच्या विकासाला साह्य