पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महारा संस्कृती
५२४
 

होता. मराठ्यांची सत्ता शक्य तर समूळ नाहीशी करावी, आणि दक्षिणेत आपले स्वतंत्र राज्य स्थापावे, अशी त्याची महत्त्वाकांक्षा होती. त्याचे सरदार मुबारिजखान, तुरुकजातखान हेही मराठ्यांचे वैरीच होते. शिवाय दक्षिणेत आर्काटचा नबाब सादतुल्लाखान व त्याच्या विभागातील कडाप्पा, कर्नूळ, शिरे, सावनूर अशा ठाण्यांवरचे नबाब हेही आपापली ठाणी पक्की धरून होते. बादशाही सनदा मानाव्या, असे यांपैकी एकाच्याही मनात नव्हते. उत्तरेत पाहिले तरी तेच. महंमदखान बंगष, सरबुलंदखान, कमरूद्दिनखान या बादशाही सरदारांना मराठ्यांचा होत असलेला उत्कर्ष मुळीच सहन होत नसे. सवाई जयसिंगासारख्या रजपूत सरदारांनी मराठ्यांना अनुकूल असा काही सल्ला बादशहाला दिला तर हे सरदार त्याला कसून विरोध करीत. बुंदेलखंड, गुजराथ, माळवा या प्रत्येक ठिकाणी मोठमोठ्या फौजा घेऊन त्यांनी मराठ्यांना पायबंद घालण्याचा सतत प्रयत्न चालविला होता. यामुळे मराठ्यांना प्रत्येक पाऊल पुढे टाकताना लढाई करावी लागे. आणि ती दरसाल करावी लागे. लढाई केल्यावाचून चौथाई सरदेशमुखीचे हक्क वसूल झाले, असे एका वर्षीही घडले नाही.

निष्ठाशून्य
 पण लष्करी बळावर मराठ्यांच्या मुलखात शिरून या मुस्लिम सुभेदार सरदारांनी जो विध्वंस केला, जो संहार केला त्यापेक्षाही, त्यांनी मोठमोठया मराठा सरदारांना नाना विलोभने दाखवून, भेदनीतीने त्यांना स्वपक्षाला सामील करून घेतले, यामुळे मराठी सत्तेची जास्त हानी झाली. चंद्रसेन जाधव, रंभाजी निंबाळकर, उदाजी चव्हाण यांच्या कथा मागे आल्याच आहेत. त्यांच्या जोडीला आता सेनासाहेब सुभा कान्होजी भोसले, सरलष्कर सुलतानजी निंबाळकर, कंठाजी कदम, उदाजी पवार, चिमणाजी दामोदर राजाज्ञा, त्रिंबकराव दाभाडे सेनापती हे सरदारही निजामाला मिळाले. आश्चर्याची गोष्ट अशी की यातल्या बहुतेकांनी शाहूछत्रपतींच्या बाजूने गुजराथ, माळवा, कर्नाटक या प्रदेशांत आणि स्वराज्यातही मोठमोठे पराक्रम करून साम्राज्यविस्ताराला विपुल साह्य केले होते. पण तरीही त्यांना आपल्या पक्षात ओढण्यात निजाम यशस्वी झाला. कोणत्याही प्रकारच्या निष्ठा त्यांच्या ठायी नव्हत्या हेच त्याचे कारण होय. निजामाला मिळण्यात आपण धर्मद्रोह करीत आहो, आणि महाराष्ट्र राज्याला विरोध करण्यात आपण राष्ट्रद्रोह करीत आहो, असे त्यांच्या मनाला कधी वाटले नाही. स्वामिनिष्ठा ही एक निष्ठा त्या काळी प्रबळ असे; पण तीही त्यांच्या ठायी नव्हती. आज शाहू, उद्या संभाजी, परवा निजाम असा नित्य रुचिपालट ते करीत.

कोल्हापूर- संभाजी
 या सरदारांप्रमाणेच कोल्हापूरचे संभाजी राजे हा साम्राज्यविस्ताराच्या मार्गातला फार मोठा अडसर होता. महाराणी ताराबाई यांच्याप्रमाणेच, मराठी राज्याचे खरे