पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
५२६
 

करता आले असते. शाहू महाराजांनी प्रत्येकाला मुलुखगिरीसाठी स्वतंत्र प्रदेश वाटून दिला होता. आणि यवनाक्रांत सर्व हिंदुस्थान त्यांना पराक्रमासाठी मोकळा होता. आपल्या हिंमतीवर सेना उभारून त्यांनी या प्रदेशात मराठी सत्ता विस्तारली असती तर छत्रपतींनी त्यांचे कौतुकच केले असते. १७२५ च्या दसऱ्यानंतर त्यांनी या सरदारांना कर्नाटकची मोहीम स्वतंत्रपणे करण्यास आज्ञाच दिली होती. या वेळी फत्तेसिंग भोसले यास प्रमुख नेमून श्रीपतराव प्रतिनिधी, खंडेराव दाभाडे, सुलतानजी निंबाळकर, सरलष्कर यांना त्याच्या हाताखाली सामील होण्याचे हुकुम सोडले होते. पेशवा बाजीराव यास त्यांनी मुद्दामच त्यातून वगळले होते. त्यांना स्वतंत्रपणे मोहीम करण्यास अवसर द्यावा, हा त्यांचा हेतू होता. पण बाजीरावावाचून हे सरदार पुढे पाऊल टाकण्यास तयारच होईनात. तेव्हा नाइलाजाने छत्रपतींना त्याला पाठवावे लागले. ही या प्रधानांची हिंमत, हे यांचे कर्तृत्व! पुढच्या वर्षीच्या कर्नाटकच्या दुसऱ्या म्हणजे श्रीरंगपट्टणच्या स्वारीत तर ते आणखीन उघडे पडले. बाजीराव स्वारीवर असताना निजामाने संभाजी राजांना उठवून शाहू महाराजांना उखडून टाकण्याचा डाव मांडला होता. त्या वेळी स्वसंरक्षणासाठी महाराजांना बाजीरावालाच परत बोलवावे लागले. ती कामगिरीसुद्धा करण्याची ताकद इतर कोणात नव्हती आणि असे असूनही या प्रधानांचा मत्सर, द्वेष कायम होता. आणि संभाजी राजांचे नाव पुढे करून निजामाला मिळणे हे उद्योग चालूच होते. आनंदराव सुमंताने तर निजामास चिथावणी दिली की बाजीरावाशी वैर धरल्यास शाहूमहाराजांना वाईट वाटणार नाही, राज्यातील कुत्रेही त्यास (बाजीरावास) सामील होणार नाही ! प्रतिनिधी, नारोराम मंत्री, अमात्य सर्वांची हीच तऱ्हा स्वतःच्या ठायी कर्तृत्व नाही आणि बाजीरावाचा उभा द्वेष ! आणि त्यापायी त्याच्या मार्गात कांटे पसरणे आणि छत्रपतींचे मन त्याच्याविषयी कलुषित करणे हा उद्योग !

थोरले बाजीराव
 अशा या परिस्थितीतून, दारचे आणि घरचे शत्रू यांचा विरोध मोडून काढून श्रीमंत बाजीराव बल्लाळ पेशवे ऊर्फ राऊस्वामी यांनी मराठी स्वराज्याचे साम्राज्य कसे केले ते आता पहावयाचे आहे. हिंदुपदपातशाहीवरील अढळ दृष्टी, अविचल स्वामिनिष्ठा, निःस्वार्थ, निकोप वृत्ती, असामान्य युद्धनेतृत्व, अखंड सावधानता आणि नवे कर्तृत्व निर्माण करण्याची विद्या या बळावरच त्यांनी हे प्रचंड कार्य साधले, यात शंका नाही.
 शाहू छत्रपती स्थिरपद झाले आणि चौथाई सरदेशमुखीच्या सनदा त्यांना मिळाल्या. त्यामुळे हिंदुपदपातशाहीच्या कार्यास नव्या उत्साहाने, नव्या जोमाने त्यांनी प्रारंभ केला. प्रथम त्यांनी कर्नाटककडे दृष्टी वळविली. त्या वेळी तुंगभद्रेच्या दक्षिणेच्या सर्वच प्रदेशाला कर्नाटक म्हणत असत. त्या प्रदेशातून चौथाईचे हक्क वसूल करण्यासाठी त्यांनी फत्तेसिंग भोसले यास आज्ञा दिली.