पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
५२०
 

रामचंद्रपंत अमात्य याच्याकडे होती. तो काही झाले तरी दुय्यम सत्ताधारी, छत्रपती नव्हे. त्यामुळे सर्वावर जरब बसविणे, सर्वांना लगामी लावणे त्याला अशक्य होते. शाहू छत्रपतींच्या कारकीर्दीत हेच झाले. प्रारंभीच्या चारपाच वर्षांच्या काळात त्यांनी बरे कर्तृत्व प्रगट केले, पण ते पुढे टिकले नाही. 'त्याची ही पहिली तरतरी अखेरपर्यंत टिकती तर मराठी राज्याचा पुढील इतिहास पुष्कळसा निराळा झाला असता असे सरदेसायांनी म्हटले आहे (पुण्यश्लोक शाहू, पृ. ४०). ते अगदी खरे आहे. पण ती तरतरी टिकली नाही आणि कारभाराची मुख्य सूत्रे पेशव्यांच्या हाती गेली. म्हणजे जबाबदारी सगळी, पण सत्ता मात्र दुय्यम, अशी स्थिती पुन्हा आली. या दुय्यम सत्तेच्या बळावर पेशव्यांनी कर्तृत्व खूपच गाजविले. त्यामुळेच मराठी स्वराज्याचे साम्राज्य झाले. पण छत्रपतींच्या एकमुखी, निग्रहानुग्रहसमर्थ अशा सत्तेच्या अभावी त्याला वर सांगितल्याप्रमाणे मुखगिरीचे रूप आले.

पेशवाईचे रूप
 पेशवाईचा उदय कसा झाला आणि या कालखंडात मराठी राज्याला कोणते रूप प्राप्त झाले ते आपण पाहत आहो. शाहूराजे दक्षिणेत येऊन छत्रपतीपदी आरूढ झाले, तेव्हा चंद्रसेन जाधव, निंबाळकर, थोरात, घोरपडे इ. अनेक सरदार महाराष्ट्रात प्रबळ होते. ते सर्व संघटित होऊन छत्रपतींना मिळाले असते तर मराठी स्वराज्याला बळकटी येऊन मोगली सत्तेचा त्याच वेळी समूळ उच्छेद झाला असता. पण ते सरदार मोगलांना जाऊन मिळाले. त्यामुळे बाळाजी विश्वनाथ या कर्त्या पुरुषाला शाहू छत्रपतींनी हाताशी घेतले व त्याला पेशवेपद दिले. सुदैवाने तो पुरुष असामान्य कर्तृत्वाचा निघाला. त्याने काही सरदारांना नमवून, काहींना शाहूपक्षाला वळवून महाराष्ट्रात संघटित शक्ती निर्माण केली आणि हुसेन अल्लीच्या गरजेचा फायदा घेऊन दिल्लीहून स्वराज्य, सरदेशमुखी आणि चौथाई या सनदा आणल्या. त्यानंतर शाहूछत्रपतींनी स्वतः राज्यकारभार पाहून स्वाऱ्या, मोहिमा केल्या असत्या तर अल्पकाळातच स्वराज्याला पूर्वीचे रूप प्राप्त झाले असते. पण ते कर्तृत्व, ते तेज त्यांच्या ठायी नव्हते. सर्व भार पेशव्यांवर सोपवून ते सुखासीन झाले. त्यामुळे सत्ता पेशव्यांच्या हाती गेली. पण अनेक सरदारांपैकी एक व अनेक प्रधानांपकी एक अशीच त्यांची पदवी असल्यामुळे, वतनदारीमुळे सुरू झालेल्या विघटनेला आवर घालणे त्यांच्या शक्तीबाहेरचे होते. इतर प्रधान व मंत्री यांना जरब बसविणे त्यांना शक्य नव्हते. वतनदारीला सरंजामदारीचे रूप आले होते तेच मान्य करून त्यांनी राज्याची व्यवस्था केली. यामुळे मराठी राज्यात अनेक, बव्हंशी स्वतंत्र अशी, राज्येच निर्माण झाली. कोणत्याही राज्याच्या बळकटीसाठी अवश्य अशी जी एकमुखी सार्वभौम सत्ता ती मराठी राज्याला कधी लाभलीच नाही. पेशवा हा त्या राज्याचा नेता झाला, पण हे नेतृत्व यशस्वी करण्यास अवश्य ती सत्ता मात्र त्याला कधी मिळाली नाही. त्यामुळे