पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५१९
पेशवाईचा उदय
 

काढण्यात येई व तो सर्व राजाच्या खर्चासाठी दिला जाई. राहिलेला तीनचतुर्थांश म्हणजे जो पंचाहत्तर टक्के वसूल त्याला मोकासा म्हणत. त्यातून राज्याचा खर्च व्हावयाचा. यातील शेकडा सहा वसूल म्हणजे साहोत्रा आणि शेकडा तीन वसूल म्हणजे नाडगौडा. हा राजाने आपल्या मर्जीप्रमाणे कोणालाही द्यावयाचा असे. आता एकंदर वसुलापैकी ६६ टक्के राहिले. हा भाग प्रदेशाच्या रूपाने निरनिराळ्या सरदारांना वाटून देण्यात आला. खानदेश व बालाघाटचा काही भाग हा पेशव्यांकडे, बागलाण व गुजराथ सेनापतीकडे, सेनासाहेब सुभा कान्होजी भोसले याच्याकडे वऱ्हाड व गोंडवन, सरलष्कराकडे गंगथडी व औरंगाबाद सुभा, प्रतिनिधी-नीरा, वारणा व हैदराबाद, चिटणीस व आंग्रे- कोकण, अशी उद्योगाची वाटणी छत्रपतींनी करून दिली. या प्रदेशांत सरदारांनी फौज ठेवून संचार करावा, वसूल करावा आणि बंदोबस्त ठेवावा अशी व्यवस्था आखण्यात आली.
 स्वातंत्र्ययुद्धाच्या काळात वतनांच्या आश्वासनांमुळे मराठ्यांना जशी पराक्रमाची स्फूर्ती मिळाली तशीच स्फूर्ती या सरंजामी व्यवस्थेमुळे आता आणि पुढे त्यांना मिळाली. पुढल्या काळात दक्षिणच्या सहा सुभ्यांखेरीज उत्तरेतील गुजराथ, माळवा, पंजाब, बंगाल, बुंदेलखंड, आग्रा, दिल्ली, दुआब, अयोध्या, ओरिसा या प्रदेशांच्या चौथाईच्या सनदा मराठ्यांनी काही खुषीने, काही जबरदस्तीने मिळविल्या. आणि यामुळेच सर्व हिंदुस्थानभर मराठयांचा संचार होऊ लागला व मुस्लिम सत्ता नष्ट झाली.

मुलूखगिरी
 पण यामुळे मराठी राज्य हे राज्य असे राहिलेच नाही. प्रदेश तोडून दिल्यामुळे आणि प्रत्येक सरदाराने स्वतंत्र फौज ठेवावयाची असल्यामुळे ते ते प्रदेश म्हणजे स्वतंत्र राज्येच झाली. आणि हे सरंजाम वंशपरंपरेने दिल्यामुळे सर्व राज्य कायमचे विघटित झाले. शिवाय दर पिढीस कर्ता पुरुष निर्माण होतोच असे नाही. त्यामुळे पराक्रम, राज्यविस्तार यासाठी दिलेले सरंजाम, पराक्रम नसतानाही, त्या त्या घराण्याकडे तसेच कायम राहिले. आणि मग स्वाऱ्या मोहिमांसाठी छत्रपती व पेशवे यांना पुरेसा पैसा मिळणे अशक्य होऊन बसले. या पद्धतीने मराठी राज्याचे साम्राज्य झाले हे खरे. पण सत्ता आणि राज्यव्यवस्था या दृष्टीने त्या साम्राज्याला फारच थोडा अर्थ उरला. मराठ्यांच्या मोहिमांना मुलूखगिरी असे कायमचे रूप प्राप्त झाले.

दुर्बल छत्रपती
 सरंजाम तोडून दिल्यामुळे मराठी राज्य विघटित झाले. आणि मराठी राज्यातील आणखी एका मोठया वैगुण्यामुळे त्या विघटनेला आवर घालणे अशक्य होऊन बसले. ते वैगुण्य म्हणजे मराठा छत्रपतींचे दौर्बल्य, त्यांची कर्तृत्वहीनता! राजारामांसंबंधी मागे सांगितलेच आहे. ते केवळ नाममात्र सत्ताधीश होते. कारभाराची सूत्रे