पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
५१८
 

दक्षिणेतले सहा सुभे. यांतून चौथाई व सरदेशमुखीचे हक्क वसूल करण्याचा अधिकार मराठ्यांना मिळाला. याच्या बदल्यात मराठयांनी आपली पंधरा हजार फौज बादशहाचे दिमतीम ठेवून तेथला बंदोबस्त राखावा असा करार होता. यामुळे मराठा सरदारांचे लक्ष घरगुती भांडणातून काढून बाहेरच्या उद्योगात लावण्याचा बाळाजीचा हेतू सिद्धीम गेला. आणि मराठ्यांना एक नवीन कार्यक्षेत्र मिळाले; आणि मराठी राज्याचे फार मोठे रूपांतर झाले.

सरंजामदारी
 वतनासक्ती आणि वतनदारी यामुळे सर्व राज्य कसे विस्कळित विघटित झाले ते मांगे सांगितलेच आहे. शाहूराजे छत्रपती झाले, तेव्हा त्यांना अनेक मराठा सरदार अनुकुल झाले तरी त्यांची वतने त्यांच्याकडे जशीच्या तशी कायमच होती. त्यात हस्तक्षेप करून शिवछत्रपतींच्या धोरणाअन्वये वतनदारीवर नियंत्रण घालणे हे शाहू छत्रपतींना सर्वथा अशक्य होते. बादशाही सनदांनंतर मराठ्यांना जो नवा उद्योग मिळाला म्हणून वर सांगितले त्यातून आता सरंजामदारी निर्माण झाली. सरदारांना स्वतंत्र फौज ठेवावयास सांगून तिच्या खर्चासाठी स्वतंत्र मुलूख किंवा प्रदेश त्यांच्याकडे लावून दिले की ती सरंजामदारी होते. आदिलशाहीचे बहुतेक सरदार सरंजामदारच होते. शिवछत्रपतींनी स्वराज्य स्थापन केल्यावर मात्र स्वतंत्र फौज ठेवण्याचा अधिकार कोणालाही दिला नाही. त्या वेळचे मराठा लष्कर हे सर्व छत्रपतींचे लष्कर होते. राजारामांच्या काळी वतनदारी पुन्हा जोरावली, तेव्हा तिला सरंजामदारीचे रूप येऊ लागले. तीच व्यवस्था शाहू छत्रपतींना पुढे चालवावी लागली. त्यांच्याजवळ पैसा नव्हता. वसूल सर्व बंद पडला होता. आणि फौज तर हवी होती. धनाजी जाधव, आंगरे, निंबाळकर, दाभाडे, नागपूरकर भोसले यांना छत्रपतींनी प्रारंभीच मोठमोठे सरंजाम तोडून दिले. हे सरदार व त्यांचे वारस मुजोर झाले, तेव्हा बाळाजीस सेनाकर्ते हो पदवी देऊन छत्रपतींचे लष्कर स्वतंत्रपणे उभारण्याची व्यवस्था त्यांना करावी लागली पण त्यामुळे सरंजामदारीला आळा बसला असे नाही.
 बादशाही सनदा मिळाल्यानंतर एकंदर राज्याकारभाराची पद्धत निश्चित करण्याची वेळ आली, तेव्हा शाहुछत्रपती व बाळाजी विश्वनाथ यांना सरंजामदारी व्यवस्था मान्य करूनच पुढे पाऊल टाकावे लागले. त्यावाचून गत्यंतरच नव्हते. असे असल्यामुळे पुढीलप्रमाणे व्यवस्था करण्यात आली.

राज्याची वाटणी
 सरदेशमुखीचे सर्व उत्पन्न हे छत्रपतींचे खाजगी उत्पन्न असे ठरविण्यात आले. उत्पन्नाचा खरा मोठा भाग म्हणजे राज्यातील वसूल आणि मोगली सुभ्यातील चौथाईचा वसूल हा होय. यातील चौथा हिस्सा वसूल हा राजबाबती म्हणून निराळा