पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
५१४
 

त्याला ' संगच्छध्वम्', 'संवदध्वम्' असे वळण लावून, एकजीव, संघटित समाज असे रूप देणारा नेता येथे निर्माणच झाला नाही.
 अशा या अराजकातून, बेबंदशाहीतून काही प्रमाणात मराठा शक्ती संघटित करण्यात व टिकविण्यात बाळाजीला व पुढे पेशव्यांना यश मिळाले, म्हणून शंभर एक वर्षे तरी मराठ्यांचा उत्कर्ष होत गेला.

कान्होजीला वळविले
 अशी शक्ती संघटित करण्याच्या बाळाजीच्या प्रयत्नातील सर्वात मोठा, अत्यंत यशस्वी व अत्यंत लाभदायक असा प्रयत्न म्हणजे कान्होजी आंग्रे याला स्वराज्य- पक्षाला वळविण्याचा होय. १६९८ सालापासून मराठा आरमाराचा कान्होजी हा प्रमुख होता. त्याला राजारामांनी सरखेल ही पदवी दिली होती. आणि आपल्या पराक्रमाने त्याने पोर्तुगीज, सिद्दी, इंग्रज या नाविक सत्तांना दहशत बसविली होती. असा हा कान्होजी शाहूराजे दक्षिणेत आल्यावर प्रथम त्यांना मिळाला होता. पण पुढे चंद्रसेनाच्या कारस्थानामुळे तो ताराबाईकडे गेला. अर्थात त्याचा बंदोबस्त करणे आले. शाहूछत्रपतींनी त्याच्यावर पेशवा बहिरोपंत पिंगळे यास पाठविले; पण कान्होजीने एकदम वरघाटी येऊन लोहगड किल्ला घेतला व बहिरोपंतास कैद केले. ही १७१३ सालची गोष्ट. या वेळी वरील आपत्तीमुळे शाहूराजांना आभाळ फाटल्यासारखे झाले. कारण विश्वासाचा व कर्ता असा एकही सरदार त्यांच्याजवळ या वेळी राहिला नव्हता. अशा वेळी बाळाजी पुढे झाला व आंग्ऱ्यांच्यावर चालून जाण्याची जोखीम त्याने पत्करली. मात्र त्याने, मला काही मोठे अधिकारपद दिलेत तर माझ्या शब्दाला प्रतिष्ठा येईल, असे छत्रपतींना सांगितले. ते त्यांना पटून त्यांनी १८ नोव्हेंबर १७१३ रोजी बाळाजीस पेशवाईची वस्त्रे दिली. अधिकार मिळताच बाळाजीने कान्होजीच्या बंदोबस्ताचे काम सुरू केले. मात्र ते त्याच्या पद्धतीने. येवढ्या बलाढ्य सरदाराला लष्करी बळाने जिंकणे अशक्य आहे, हे बाळाजी जाणत होता. म्हणून त्याने आपली माणसे पाठवून कान्होजीला परिस्थिती व शत्रुमित्रांचे बलाबल याची यथार्थ कल्पना दिली. ताराबाईच्या पक्षात आता काही अर्थ राहिला नव्हता. पश्चिमेच्या नाविक सत्तांचे बळ वाढत होते. अशा वेळी शाहू छत्रपतींचा व सर्व स्वराज्याचा पाठिंबा त्याला लाभला तर त्याला वाटेल तो पराक्रम करता येईल, हे बाळाजीने कान्होजीला पटवून दिले. आणि कुलाब्याला जाऊन त्याची प्रत्यक्ष भेट घेऊन, 'महाराजांचे चाकर होऊन कृपा संपादून घ्यावी' हा विचार त्याच्यापुढे मांडला. कान्होजीला तो मान्य झाला. आणि पश्चिमेचा हा बलाढ्य सरदार स्वराज्याचा आधारस्तंभ झाला. ताराबाईचा पक्ष नामशेष करून टाकणे आणि स्वराज्याची पश्चिम दिशा निर्धास्त करून टाकणे ही दोन कामे बाळाजीने या उद्योगाने साधली. त्यामुळे महाराष्ट्रात त्याची प्रतिष्ठा मोठ्या प्रमाणात वाढली. आणि पेशवा हे एक नवे सामर्थ्य महाराष्ट्रात निर्माण झाले.