पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५१३
पेशवाईचा उदय
 


निष्ठेअभावी
 १७१६ साली जाधव, निंबाळकर, थोरात, मुहकमसिंग, तुरुकजातखान यांनी साताऱ्यावर चालून जाण्याची मोहीम आखली होती आणि रोहिडेश्वर, लोणी- भापकर येथपर्यंत ते आलेही होते. चंद्रसेनाने शाहूस व दमाजीने बाळाजीस पकडून द्यावयाचे असा मोगलांनी व्यूह रचला होता. पण बाळाजीने दाभाडे, मोरे, शिवदेव, सुलतानजी निंबाळकर यांच्या सेना एकत्र करून तो मोडून काढला. याचसाठी 'अतुल पराक्रमी सेवक' म्हणून शाहूछत्रपतींनी बाळाजीचा गौरव केलेला आढळतो. याच सुमारास दमाजी थोराताकडे शाहूपक्षामार्फत बोलणे करण्यास बाळाजी गेला होता. थोराताकडून त्याने आधी बेलभंडाराची शपथही आणविली होती. पण भेटीस येताच थोराताने बाळाजीस कैद केलं आणि जबर दंडाची मागणी केली. शपथेची आठवण देताच तो म्हणाला, बेल म्हणजे झाडाचा पाला, आणि भंडार म्हणजे रोजची खायची हळद! त्याचे काय महत्त्व! शेवटी सावकारांकडून पैसा जमवून दंड भरला, तेव्हा बाळाजीची सुटका झाली. १७१८ साली बाळाजी पेशव्याचा व सय्यद हुसेन अली यांचा तह ठरला. त्याबरोबर तिकडून तोफखाना आणून बाळाजीने दमाजी थोरातावर चाल केली. त्यास कैद केले आणि त्याच्या हिंगणगावच्या गढीवर नांगर फिरविला. पण वर्षभराने कैदेतून सुटल्यावर थोराताने पूर्वीचाच उद्योग आरंभिला. त्यामुळे पुन्हा तो कैदेत पडला व तेथेच मृत्यू पावला.

भालेराई
 हिंदुराव घोरपडे, रंभाजी निंबाळकर, उदाजी चव्हाण या सरदारांच्या कथा काहीशा याच स्वरूपाच्या आहेत. स्वातंत्र्ययुद्धाच्या काळी भालेराई निर्माण झाली म्हणून मागे सांगितले आहे. त्या भालेराईचीच ही पुढली परंपरा आहे. या सरदारांना आपल्यावर कोणाची सत्ता म्हणून नको होती. स्वराज्य, स्वातंत्र्य, मराठ्यांचा उत्कर्ष याचे कसलेही सोयरसुतक यांना नव्हते. लष्कर जमवावे, चौफेर लुटालूट करावी, कधी दंडेलीने चौथाई, कधी सरदेशमुखी वसूल करावी, असा त्यांचा जीवनक्रम होता. या धोरणात ज्या वेळी ज्या पक्षाला मिळावेसे वाटेल त्याला ते मिळत आणि कार्यभाग झाला की पुन्हा उधळून जात. बाळाजीने मोगल बादशहाकडून सनदा आणल्यावर हे सरदार जरा नरम पडले. स्वराज्याला स्थैर्य येऊन त्याची शक्ती वाढल्यामुळेही त्यांचा जोर हटला. पण खरे म्हणजे याचा बंदोबस्त पूर्णपणे केव्हाच झाला नाही, कारण कोल्हापूरचा संभाजी, निजाम आणि पेशव्यांचे इतर हितशत्रू यांचा अशा सरदारांना नेहमीच पाठिंबा असे, त्यामुळे भालेराई कधी संपली नाही, आणि अराजक निमाले नाही. मराठी स्वराज्याचे साम्राज्य झाले तरी त्यातही हीच स्थिती होती. आणि याचे मुख्य कारण म्हणजे धर्म, स्वराज्य, स्वातंत्र्य यासंबंधीच्या निष्ठा या समाजाला शिकवून
 ३३