पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
२७
अस्मितेचा उदय
 

राजा होता, त्याचा सीता 'महाराठ्ठ वरिठ्ठो' असा निर्देश करते. यावरून विदर्भ व कुंतल हे दोन विभाग त्या वेळी महाराष्ट्रात मोडत होते असे दिसते. ' चतुर्विशति प्रबंध ' या आपल्या ग्रंथात राजशेखर महाराष्ट्राचा अनेक वेळा उल्लेख करतो. ' इह भारतवर्षे दक्षिणखंडे महाराष्ट्र देशावतंसं श्रीमत् प्रतिष्ठानं नाम पत्तनं विद्यते ' (पृ. १३६) हा त्यांपैकी एक होय. यात पैठणचा उल्लेख येतो. विदर्भ, कृष्णाकाठ व पैठण या तीहींवरून आजच्या महाराष्ट्राच्याच सीमा त्या वेळी असाव्या असे दिसते.

लीलावई
 कोऊहल कवी इ. स. ८०० च्या सुमारास होऊन गेला. त्याने आपले 'लीलावई' हे खंडकाव्य 'महरठ्ठ-देसी भासा ' मध्ये लिहिले आहे. का? तर त्याच्या प्रियतमेने 'सर्वसाधारण स्त्रियांना समजेल अशा भाषेत तुम्ही काव्य लिहा ', असा आग्रह धरला म्हणून ( लीलावई ४१ व १३३० ) . 'लीलावती' या काव्यात शातवाहन राजा हाल व सिंहलद्वीपाची राजकन्या लीलावती यांच्या प्रणयाची व विवाहाची कथा आहे. त्यात प्रारंभीच कवीने हाल राजाच्या राज्याचे जे वर्णन केले आहे त्यातून त्याच्या मनातील महाराष्ट्र. अश्मक व हालाची राजधानी प्रतिष्ठान (पैठण) नगरी यांच्याविषयीचा उत्कट अभिमान प्रकट झालेला आहे. कवी म्हणतो, 'पृथ्वीला भूषणभूत असलेल्या या प्रदेशात धनधान्यसमृद्धीमुळे शेतकरी संतुष्ट असतात. मदिरा- पानाने सुखी होऊन येथले लोक गाणी गातात. त्या गीतसौंदर्याने उद्याने नेहमी भरून गेलेली असतात. या महाराष्ट्रात नित्य कृतयुग असते. ही भूमी म्हणजे धर्माचा आधार आहे. येथील सृष्टी म्हणजे ब्रह्मदेवाची शाळाच आहे. ही सृष्टी पाहूनच तो आपली सृष्टिरचना करतो. हा देश सुखसमूहांचे जन्मस्थान होय. सद्गुणांचे सुक्षेत्र होय. येथले कोवळे गवत खाऊन गोधन पुष्ट झालेले असते व त्याच्या हंबरण्यामुळे दिशा निनादून गेलेल्या असतात. येथे सर्वत्र जलविहार करण्याजोगी तळी आहेत. उत्तम वृक्षवेली असलेली उद्याने आहेत. सर्वत्र कमळांनी भरलेली सरोवरे आहेत. या भूमीत कलिकाल येतच नाही. येथे पाप कोणी पाहिलेले नाही. शत्रुचा पराक्रम येथे कोणाला दिसतच नाही. या देशाची राजधानी प्रतिष्ठान नगरी अत्यंत रम्य असून ती गोदावरीच्या काठी वसलेली आहे. या नदीत स्नान करून मरहट्टीया स्त्रिया आपली सर्व पापे धुऊन टाकतात. त्यांच्या वक्षांची हळद पाण्यात मिसळल्यामुळे गोदावरीचे पाणी पिवळसर झालेले असते. ' ( लीलावई - संपादक - डॉ. उपाध्ये पृ. ११-१५ ). स्वभाषा व स्वदेश यांच्या अभिमानाचे इतके स्पष्ट दर्शन या काव्यात होते की या काळी महाराष्ट्राची अस्मिता संशयातीत होती असे म्हणण्यास हरकत नाही.
 उद्योतनसुरी याने आपला 'कुवलयमाला' हा अपभ्रंश भाषेतील काव्यग्रंथ इ. स. ७७८ च्या सुमारास रचला. त्यात त्याने 'घटमुट, काळासावळा, सहनशील, अभिमानी व कलहशील आणि दिण्णले, गहिल्ले असे बोलणारा मरहट्टा' असे