पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
५०२
 

धक्का लागेल अशी शंका येताच, मराठा वतनदार मोगलांना मिळू लागले, म्हणजे बादशहाची सत्ता एकदमच त्यांनी मान्य केली. यामुळेच शिवछत्रपतींचे आर्थिक तत्त्व सोडून देऊन मराठा नेत्यांना लोकांचा वतनलोभ पुरा करावा लागला. यामुळे फितुरीला काहीसा आळा बसला, वतनदार मोगलांऐवजी छत्रपतींसाठी लढू लागले. पण काही दिवस जाताच फितुरी पुन्हा बळावली. या फितुरीमुळे आणि वैयक्तिक मानापमान, लोभ, मत्सर, सूडभावना यांमुळे मराठा संघटना फुटली आणि सर्वत्र दुही माजू लागली. आणि मराठ्यांचे सामर्थ्य आणखी खच्ची झाले. म्हणून द्विरुक्ती करून सांगावेसे वाटते की शिवछत्रपतींनी स्वराज्यस्थापना करताना राष्ट्रसंघटनेची जी महान तत्त्वे या भूमीत नव्याने प्रस्थापित केली होती त्यांचा या स्वातंत्र्ययुद्धाच्या काळात मराठी जीवनातून बव्हंशी लोप झाला. आणि त्यामुळे स्वातंत्र्ययुद्ध जिंकल्यानंतरही महाराष्ट्राच्या भवितव्याबद्दल सर्वत्र निराशाच दिसू लागली.
 पण मग स्वातंत्र्ययुद्धाचे फळ अगदी शून्य झाले असे म्हणावयाचे की काय ?

फलश्रुती
 तसे नाही. औरंगजेबासारख्या शत्रूला मराठ्यांनी धुळीस मिळविले हे मराठ्यांचे या इतिहासात जमा राहीलच. मागल्या प्रकरणात पूर्वीच्या मुस्लिमांच्या आक्रमणाच्या वेळची हिंदूंची स्थिती आणि आताची स्थिती यांची तुलना केली आहे. तिचा निष्कर्ष हा अबाधितच आहे. दरवेळी पराभव आणि मुस्लिम सत्तेची स्थापना हा इतिहास आता पालटला. सर्वात बलाढ्य मुस्लिम बादशहा, पंचवीस वर्षे पाय रोवून आक्रमण करून बसला असूनही, मराठ्यांनी अखेर त्याला संपूर्णपणे पराभूत केले आणि मराठ्यांचे स्वराज्य अबाधित राखले याचे श्रेय त्या लढवय्या वीरांना दिलेच पाहिजे. पुढच्या काळात पेशव्यांनी मराठा साम्राज्य स्थापन केले आणि गुजराथ, माळवा, पंजाब, बंगाल, बिहार, कर्नाटक इ. भारतातल्या सर्व प्रदेशांतील मुस्लिम सत्तेची पाळेमुळे खणून काढली. हे कार्य त्यांना करता आले ते मराठ्यांनी हे स्वातंत्र्ययुद्ध जिंकले आणि स्वराज्याचा पाया मजबूत राखला म्हणूनच.
 शिवछत्रपतींनी प्रस्थापिलेली राष्ट्रनिष्ठेची तत्त्वे, धर्मक्रान्तीची तत्त्वे, नव्या अर्थव्यवस्थेची तत्त्वे, समाजपरिवर्तनाची तत्त्वे यांची त्यानंतरच्या काळात जोपासना झाली असती, ती तत्त्वे समाजात रुजली असती तर अखिल भारतात त्यांचा प्रसार झाला असता आणि मराठा साम्राज्याचे हिंदवी साम्राज्यात रूपांतर होऊन ते साम्राज्य अत्यंत दृढ पायावर उभे राहिले असते आणि मग त्याला पाश्चात्य आक्रमकांशीही यशस्वीपणे मुकाबला करता आला असता. पण त्या तत्त्वांची जोपासना स्वातंत्र्ययुद्धाच्या काळात झाली नाही, इतकेच नव्हे, तर त्यांची सर्वांना विस्मृती झाली. त्यामुळे छत्रपतींचे भारतासंबंधीचे ते भव्य स्वप्न साकार झाले नाही.