पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५०१
प्रेरणांची मीमांसा
 

धर्मच होय, दुष्ट तुरुक यांची सेवा हा अधर्म आहे, कलियुग किंवा कृतयुग हे राजाच्या कर्तृत्वावरच अवलंबून असते, हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा आहे ही जी संजीवनीदायक तत्त्वे त्यांचा अखंड प्रचार करणे, त्यांचे सतत संस्कार जनमनावर करणे हे अवश्य होते. पण तसा प्रयत्नसुद्धा कोणी केल्याचे दिसत नाही. मोगली आक्रमण येताक्षणीच अनेक सरदार वतनदार दुष्ट तुरुक यांची सेवा करण्यास सिद्ध झाले. श्रींच्या इच्छेचा त्यांनी विचारही केला नाही. श्रींची इच्छा !

धार्मिक वतनदार
 जी गत छत्रपतींच्या तत्त्वांची तीच समर्थांच्या उपदेशाची. बुडाला औरंग्या पापी, म्लेंछसंहार जाहला, मारता मारता मरावे, कष्टेकरूनि घसरावे म्लेंछावरी, वन्ही तो चेतवावा रे, रामकथा ब्रह्मांड भेदूनि पैलाड न्यावी, ही समर्थांची वचने छत्रपतींच्या काळी लोकांच्या कानावर सारखी पडत होती. सेवकधर्माचा केवढा उत्तम उपदेश समर्थांनी केला होता. आपस्वार्थ करून स्वामीकार्य बुडविणे ही सेवकांची लक्षणे नव्हत. 'फितव्याने बुडती राज्ये,' 'बुडाले ते भेदवाही ते,' 'कार्य करिता काही न मागे, तयाची चिंता प्रभूसि लागे,' हे संस्कार समर्थ व त्यांचे महंत सारखे करीत होते. पण समर्थ जाताच सर्व समर्थ संप्रदाय निष्प्रभ झाला. एवढ्या शेकडो शिष्यांतून त्यांचे कार्य चालविणारा एकही कर्ता महंत निघू नये हे केवढे दुर्दैव. या महंतांनी महाराष्ट्रधर्माचे कार्य तर केले नाहीच, उलट द्रव्यलोभाने ते आपसात तंटे करू लागले. आणि या शिष्यगणांत समर्थांचा पट्टशिष्य उद्धव गोसावी हाही होता. द्रव्यलोभाने देवस्थानच्या व्यवस्थेत भानगडी करणाऱ्या उद्भव गोसावी, गोविंद गंभीर राऊ, जिजोजी काटकर यांसारख्या लोकांना जरब भरणारी संभाजी महाराजांची अनेक पत्रे उपलब्ध आहेत (शिवपुत्र संभाजी, पृ. ४४४). म्हणजे वतनदारांनी वतनासाठी ज्याप्रमाणे तंटे सुरू केले त्याचप्रमाणे महंत, मठपती, पुजारी यांनीही सुरू केले. धार्मिक क्षेत्रातले हे वतनदारच झाले.

तत्त्वलोप
 अशा रीतीने या स्वातंत्र्ययुद्धाच्या वीसपंचवीस वर्षांच्या काळात, राष्ट्रसंघटनेची जी नवी तत्त्वे शिवछत्रपतींनी प्रस्थापित केली होती, आणि ज्यांच्या बळावर त्यांनी नूतनसृष्टी निर्माण केली होती, त्या तत्त्वांचा मराठी मनातून बव्हंशी लोप झाला. हे मऱ्हाष्ट्र राज्य आहे आणि त्यासाठी आपण प्राणार्पणासही सिद्ध झाले पाहिजे ही निष्ठा येथे राहिलीच नाही. बाजीप्रभू, मुरारबाजी, तान्हाजी मालुसरे, प्रतापराव गुजर यांच्यासारखे धारातीर्थी पुण्यस्नान केल्याचे उदाहरण एवढ्या दीर्घकाळात एकही घडले नाही. प्रसंग येताच किल्लेदार भराभर किल्ले मोगलांच्या ताब्यात देऊन मोकळे होऊ लागले. राष्ट्रभावना नष्ट झाल्यामुळेच, औरंगजेब दक्षिणेत उतरल्यावर, वतनाला