पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
५००
 

ते प्रल्हाद निराजी याला देण्यात आले. रामचंद्रपंत याला हुकमतपन्हा हा फार मोठा किताब देण्यात आला. शंकराजी नारायण हा सचिव आणि संताजी घोरपडे हा सेनापती झाला. इतरही प्रधानपदे त्या वेळी भरण्यात आली.

धरबंध नाही
 व्यवहारात याप्रमाणे दोन्ही छत्रपतींच्या कारकीर्दीत अष्टप्रधानांच्या नेमणुका झाल्या, तरी प्रत्यक्ष राज्यकारभार व्यवस्थित चालणे त्या वेळी जवळ जवळ अशक्यच होते. कारण सर्व मुलूख मोगलांनी व्यापला होता आणि पंचवीस वर्षे सतत युद्ध चालू होत. शिवाय वतनलोभामुळे लोक वाटेल ती कृत्ये करीत असल्यामुळे कशाचाच काही धरबंध राहिला नव्हता आणि मुलखाचा राजा दूरदेशी जाऊन राहिला होता ! तेव्हा शेती, व्यापार यांचे संरक्षण, जीवितवित्ताचे रक्षण कायद्याचे पालन, न्यायदान, महसूल हा जो राज्यकारभार तो व्यवस्थित चालणे दुरापास्तच होते.

शुद्धी ?
 धर्माच्या राजकीय व्यवस्थेतही सर्वत्र हीच स्थिती होती. देवळे, मठ, उत्सव यांना दिलेल्या जमिनी, वर्षासने यांची वजावट नेहमीप्रमाणे घालणे कठीणच होते. या क्षेत्रातील एका गोष्टीकडे विशेष लक्ष वेधणे अवश्य आहे, ती म्हणजे शुद्धी किंवा धर्मांतरितांचे परावर्तन. छत्रपतींनी शुद्धीचा पुरस्कार करून बजाजी निंबाळकर, नेताजी पालकर यांना स्वधर्मात परत घेतल्याचे मागे सांगितलेच आहे. शंभुछत्रपतीं नीही शुद्धीसंबंधी आज्ञा दिल्याचे कागदपत्र सापडतात. पण औरंगजेबाने जे फार मोठ्या प्रमाणावर धर्मांतर चालविले होते त्याकडे लक्ष देऊन त्या सर्वांचे परावर्तन करण्याचा कटाक्ष, पंडितराव हा जो प्रधान, याने बाळगलेला दिसत नाही. हे ठळकपणे दिसून येते ते शाहूच्या ऐवजी औरंगजेबाने वाढविलेले प्रतापराव गुजराचे जे खंडोजी व जगजीवन हे मुलगे त्यांना स्वधर्मात परत घेण्याची व्यवस्था कोणीच केली नाही यावरून. त्यांचे वंशज अद्यापही मुसलमानच आहेत ! औरंगजेबाने नेताजीशिवाय साबाजी घाटगे, जानोजी राजे यांना आणि अनेक ब्राह्मणांना सक्तीने बाटविले होते, हे राजवाडे खंड १५ यातील कागदपत्रांवरून दिसून येते. आणि त्याची कडवी धार्मिक वृत्ती पाहता त्याने आणखी शेकडो, हजारो लोकांना बाटविलेले असणार हे उघडच आहे. पण या सर्वांना परत स्वधर्मात घेण्याची व्यवस्था त्या काळी छत्रपती किंवा प्रधान यांनी केली नाही ही मोठी दुर्दैवाची गोष्ट होय.

श्रींची इच्छा
 पण एवढ्यावरच हे दुर्दैव थांबले नाही. शिवछत्रपतींनी जी धर्मक्रान्तीची तत्त्वे प्रत्यक्षात आचरिली त्या सर्वांचीच त्यांच्या मागून उपेक्षा झाली. स्वराज्य सेवा हा