पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
४९८
 

आहे, यासंबंधीच्या तुमच्याअटी आम्हाला मान्य आहेत', असा मजकूर लिहून, एकाचे पत्र दुसऱ्याच्या हाती पडेल, अशी व्यवस्था केली. यामुळे या दोघांची मने काही काळ कलुषित झाली होती. ताराबाईच्या योजनेला रामचंद्रपंतांनी विरोध केला, तेव्हा तिने त्याच्यावर औरंगजेबाला सामील असल्याचा आरोप केला होताच. त्यात या पत्राची आणखी भर पडून त्या दोघांच्या मनावरचे तणावे वाढतच गेले. तरीही ही माणसे स्वराज्यनिष्ठ राहिली, पुढल्या सात वर्षांच्या काळात महाराणी ताराबाई यांच्याशी एकनिष्ठ राहून त्यांनी स्वातंत्र्यसंग्रामाला सर्वतोपरी साह्य केले. म्हणूनच मराठ्यांना ते युद्ध जिंकता आले. पण तो संग्राम संपला, औरंगजेबाचा मृत्यू झाला आणि अजमशहाने मुक्त केल्यावर शाहूराजे परत आले, त्या वेळी मात्र राजघराण्यातील व कर्त्या पुरुषांतील दुही सांधण्यास कोणीच समर्थ झाला नाही आणि मराठ्यांचे स्वराज्य कायमचे पंगू होऊन बसले.

राष्ट्रभाव शून्य
 शाहू राजे परत आले, त्यानंतर मराठमंडळात जी दुही माजली ती फार भयंकर होती. तिच्यातून हे राज्य सावरेल असे त्या वेळी कोणासच वाटत नव्हते. कारण त्या दुहीतून फार घातक अशी फितुरी निर्माण झाली. धनाजी जाधवाच्या मागून त्याचा मुलगा चंद्रसेन जाधव हा काही काल ताराबाईकडे राहतोसे दाखवून पुढे मोगलांना जाऊन मिळाला. आणि त्याच्या मागोमाग दमाजी थोरात, रावरंभा निंबाळकर, घोरपडे, खटावकर असे बडेबडे मराठे सरदार मोगलांना जाऊन मिळाले. म्हणजे काही सरदार शाहूकडे व काही ताराबाईकडे अशा दुहीवर भागले नाही तर दोघांनाही सोडून सेनापतीसकट बहुतेक प्रमुख मराठे सरदार, स्वातंत्र्ययुद्ध जिंकलेले असतानाही, मोगलांना जाऊन मिळाले. आणि त्यांनी छत्रपतींनी निर्माण केलेली राष्ट्रभावना शून्यावर आणून ठेविली. स्वराज्य, स्वधर्म यांचे अद्वैत है समर्थांच्या व शिवछत्रपतींच्या धर्माचे मूलतत्त्व होते. त्याची अल्पसुद्धा, पुसटसुद्धा, जाणीव मराठ्यांना स्वातंत्र्ययुद्ध जिंकल्यावरही राहू नये ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट होय. असो. हा पुढचा स्वातंत्र्ययुद्धानंतरचा इतिहास आहे. त्याचे सविस्तर विवेचन पुढच्या कालखंडात येईलच. येथे आता स्वातंत्र्ययुद्धाच्या कालखंडातील संस्कृतीच्या इतर एकदोन अंगांचे विवेचन करून हे प्रकरण संपवू.
 या युद्धकालातली मराठ्यांची युद्धविद्या आणि त्या वेळची वतनदारी व सरंजामदारी यांचे विवेचन वर सविस्तर केले आहे. आता त्या काळची राज्यव्यवस्था व धर्मव्यवस्था कोणत्या स्वरूपाची होती ते पाहू.

राज्यव्यवस्था
 शंभुछत्रपतींनी शिवछत्रपतींची अष्टप्रधान व्यवस्था उधळून देऊन सर्व कारभार