पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४९७
प्रेरणांची मीमांसा
 

दुर्दैव ते काय ? मराठ्यांना ही अत्यंत लांछनास्पद गोष्ट झाली. याचे कारण पाहता एक गोष्ट स्पष्ट दिसते की या वेळी राष्ट्राला एक शास्ता असा नव्हता. सगळे मालक व सगळे नोकर अशी स्थिती होती. आणि राष्ट्रीय उत्कर्ष हे एकमेव उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून कोणी वागत नव्हते. मानापमान, खाजगी द्वेष, सूडभावना, मत्सर, स्वार्थ याच प्रेरणांनी प्रमुख माणसे वागत होती. मोठ्या ध्येयासाठी या भावनांना आवर घालावा, आणि राष्ट्रीय ऐक्य अभंग राखावे हे संस्कार मराठी मनात कधी खोल रुजलेच नाहीत.
 यामुळेच एक लढाई व खून होण्यावर हे प्रकरण संपले नाही. संताजीचे पुत्र, बंधू पुतणे यांचा धनाजीशी दावा चालूच राहिला. इ. स. १७०० साली घोरपडे व धनाजी यांची ब्रह्मपुरीनजीक लढाई होऊन घोरपड्यांचा मोड झाला. पुन्हा एक लढाई १७०१ साली नीरेजवळ होऊन तीत धनाजीचा पराभव झाला. सुदैव असे की या लढाईनंतर धनाजीने घोरपड्यांची भेट घेऊन सख्य केले. त्यामुळे मग संताजीचे पुत्र राणोजी व पिराजी यांनी पुढे स्वराज्यात चांगली कामगिरी केली.

मूळ स्वभावधर्म
 पण विवेक, समंजसपणा, राष्ट्रहितबुद्धी यांचा प्रभाव पडून दुही सांधण्याचे असले प्रकार अपवादात्मकच होत. खालच्या बाजूला वाहात जाणे हा जसा पाण्याचा स्वभावधर्म तसाच विघटित होणे, फुटणे हा बहुतेक सर्व मानवी समूहांचा स्वभावधर्मच होय. या काळात मराठ्यांची तीच स्थिती होती. घोरपडे आणि जाधव यांनी आपली वैरे विसरून परस्परांत स्नेहभाव प्रस्थापित केला. पण त्याच सुमारास राजाराम महाराजांचा मृत्यू झाला. आणि वारसाच्या प्रश्नावरून महाराणी ताराबाई यांनी भोसल्यांच्या राजघराण्यात दुहीची बीजे पेरून मराठ्यांच्या स्वराज्याची एकता कायमची भंगून टाकली. शाहूराजांचा गादीवर कसलाही हक्क नाही, माझा मुलगा शिवाजी यालाच गादी मिळाली पाहिजे, असा हट्टाग्रह तिने मांडला व त्यामुळे रामचंद्रपंत, शंकराजी नारायण, परशुराम त्रिंबक, धनाजी यांच्यातच दोन तट पडले, हे मागे सांगितलेच आहे. धनाजी व रामचंद्रपंत यांना हे मान्य नव्हते. पण शंकराजी व परशुराम त्रिंबक यांना ताराबाईंनी आपल्या पक्षाला वळवून घेण्यात यश मिळविले. सुदैव एवढेच की रामचंद्रपंत व धनाजी यांनी सवतासुभा मांडला नाही, आणि राज्यरक्षणाच्या कामातून अंगही काढून घेतले नाही. पण रामचंद्रपंताचे कर्तृत्व पहिल्यासारखे पुन्हा केव्हाही दिसले नाही हे खरे आहे.

कपटपत्रे
 अमात्य आणि परशुराम त्रिंबक यांच्यात दुरावा निर्माण होण्याचे आणखी एक कारण म्हणजे औरंगजेबाची कपटविद्या. बादशहाने या दोघांना स्वातंत्रपणे पत्रे लिहिली. त्यांत, 'तुम्ही आमच्या पक्षाला येण्याची इच्छा प्रगट केली, याचा आम्हांला संतोष
 ३२