पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४९५
प्रेरणांची मीमांसा
 

आणि त्याने स्वराज्य जिवंत ठेवले हा लाभ काही थोडा झाला नाही. पण दुहीमुळे आणि यादवीमुळे मराठ्यांचा प्रतिकारच मोडून पाडण्याची वेळ आली होती.

दुही हीच प्रकृती
 जगाचा एकंदर इतिहास पाहता दुही, फुटीरपणा, विघटनवृत्ती हीच समाजाची मूल प्रकृती आहे असे दिसते. त्यामुळे जो समाज एकजूट, संघटना करतो तो सर्वत्र विजयी होतो. युरोपात ब्रिटन परमोत्कर्ष पावले त्याचे एक कारण म्हणजे त्याने केलेली एकतेची उपासना. ब्रिटनचे हे यश इतके अपूर्व आहे की इतिहासपंडित जगातला तो एक चमत्कार मानतात. अलीकडच्या काळात जपान हे तसे राष्ट्र आहे. पण एकंदर इतिहासात हे अपवादच मानावे लागतात. आपल्या चालू मध्ययुगीन काळातल्या भारताचा विचार केला तर काय दिसेल ? रजपूत एवढे पराक्रमी, ध्येयवादी, तेजस्वी; पण त्यांना संबंध राजस्थान संघटित करणे कधीही साध्य झाले नाही. त्यामुळे त्यांचे सर्व सद्गुण मातीमोल झाले. शिखांची तीच अवस्था. त्या मानाने विजयनगरला पुष्कळच यश आले. शिवछत्रपतींच्या आधी तीनशे वर्षे मराठे छिन्नभिन्न स्थितीत होते. छत्रपतींनी या समाजाला संघटित करताच महाराष्ट्रात स्वराज्य आले. ती संघटनवृत्ती त्यांच्या मागे त्या प्रमाणात टिकली नाही. म्हणून मराठ्यांना अपेक्षेइतके उज्वल यश आले नाही.

दोन पक्ष
 शिवछत्रपती जाताच प्रथम सोयराबाई व संभाजी असे दोन पक्ष पडले. त्यामुळे अनेक कर्ती माणसे व्यर्थ प्राणास मुकली. संभाजी महाराजांनी फार अल्पावधीत प्रतिपक्ष निष्प्रभ करून टाकला. त्यामुळे पुष्कळच सावरले. पण ध्येयवाद, राष्ट्रभावना ही जी संघटनेची प्रेरक तत्त्वे त्यांचे संस्कार करण्याचे सामर्थ्य त्यांच्या ठायी नसल्यामुळे अल्पावधीतच विघटनेला सुरुवात झाली. पुढे त्यांच्या धीरोदात्त मृत्यूमुळे आणि महाराणी येसूबाई व छत्रपती राजाराम यांच्या विवेकी त्यागवृत्तीमुळे ऐक्यबंधन पुन्हा सजीव झाले. आणि रामचंद्रपंत, शंकराजी नारायण, संताजी, धनाजी या कर्त्या पुरुषांनी एकजुटीने कार्य करून स्वराज्याचे रक्षण केले. १६९० ते १६९५ या सहा वर्षात मराठ्यांनी जो अद्भुत पराक्रम केला त्याचे श्रेय या नेत्यांच्या ऐक्यवृत्तीलाच आहे. पण दुर्दैवाने या ऐक्याला तडे जाऊ लागले आणि मराठ्यांचे सामर्थ्य खच्ची होऊ लागले. संताजी व धनाजी हे जे स्वराज्याचा गाडा ओढणारे नरपुंगव, त्यांच्यांतच भेद पडला आणि या दोघा वीरांचे सामर्थ्य शत्रूच्या निर्दाळणास उपयोगी पडावयाचे ते एकमेकांशी झुंजण्यात वाया जाऊ लागले.
 या दोघांमधे वितुष्ट येण्याचे मुख्य कारण म्हणजे सेनापतिपदाविषयीची दोघांची आकांक्षा हे होय. धनाजीला ते पद हवे असताना, राजाराम महाराजांनी ते संताजीला