पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
४९४
 



फक्त स्वार्थ
 पण एवढ्याने भागले नाही. शंकराजी नारायण, सुंदर तुकदेव, संताजी घोरपडे, धनाजी जाधव हे सरदार या वतनांच्या बाबतीत मन मानेल तशी ढवळाढवळ करू लागले, एकाच वतनासाठी ते परस्परविरोधी पक्ष घेऊ लागले. त्यामुळे त्यांच्यात तट पडले. कलह माजले, काही वेळा तर खऱ्याखोट्याची लाज लोकांनी इतकी सोडली की एकाच वतनाच्या अनेकांना सनदा मिळू लागल्या. रामचंद्रपंतास काही सुचेनासे झाले. जिंजीहून सनदा येत, त्यांचा त्याला मेळच चालता येईना. बरे, छत्रपतींचा हुकुम तर मानला पाहिजे. मग काही तरी करून तो निभावणूक करू लागला. मिळून काय तर जागीर कोणास तोडून द्यावयाची नाही, असा शिवाजीचा कडक नियम लयास जाऊन, मराठी राज्याचे नुकसान झाले. मराठ्यांनी आपत्प्रसंगी बादशहात विरोध केला. पण तेवढ्याने खरी राष्ट्रीय भावना लोकांच्या मनात उत्पन्न झाली असे नाही. जो तो स्वार्थाकरिता धडपडत होता. महाराष्ट्रीयांचा हा स्वभावच बनला. लालुचीशिवाय ते हलत नाहीत. स्वदेश, स्वराज्य यांचे रक्षण करणे आपले कर्तव्य आहे, असे एकाच्याही मनात येत नव्हते. मोबदला घेतल्याशिवाय एकही इसम हालत नव्हता. शिवाजीच्या वेळची राष्ट्रीय भावना यावेळी अगदी मावळली. (स्थिरबुद्धी राजाराम, पृ. ९२- १००)

भालेराई
 आणि यातूनच महाराष्ट्रात भालेराई म्हणतात ती निर्माण झाली. मोगलांनी एखादे ठाणे हस्तगत केले की चार मराठा गड्यांनी जमून, भाले घेऊन जमाव करावा आणि ते ठाणे परत घेऊन लूट करावी आणि पोट भरावे. ना कोणी विचारता, ना नियंता. या अरेरावीमुळे मोगलांस तात्पुरता आळा बसला, पण देशात निर्यायकी निर्माण झाली. रामचंद्रपंत, प्रल्हाद निराजी हे नेते मराठ्यांचा जम बसवू लागले, तेव्हा त्यांच्याच पक्षातील या बिनशिस्ती उपटसुंभांचा त्यांना मोठा उपद्रव होऊ लागला. भालेराई ती हीच. भालेराई म्हणजे अव्यवस्था, अराजक. वतनलोभामुळे ज्याप्रमाणे समाज विघटित झाला तसाच या भालेराईमुळेही झाला.

दुही-यादवी
 वतनलोभ, त्यामुळे स्वत्वशून्यता, त्यातूनच उद्भवलेली फितुरी आणि बेशिस्त असे फार मोठे दुर्गुण मराठ्यांच्या ठायी या स्वातंत्र्ययुद्धाच्या काळात निर्माण झाले व मूळचे दबलेले फिरून उफाळून वर आले. पण याहीपेक्षा जास्त घातक असा दोष म्हणजे दुही आणि तीतूनच निर्माण झालेली यादवी हा होय वतनलोभावर छत्रपतींनी त्वरित उपाययोजना केली. वतने सर्रास देऊन त्यांनी मराठ्यांना प्रतिकाराला सिद्ध केले. हा उपाय दोषलिप्त होता हे खरे. पण त्यामुळे सर्व महाराष्ट्र मोगलांविरुद्ध उभा ठाकला