पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
२५
अस्मितेचा उदय
 

तेराव्या शतकात मराठी भाषा परिपक्व दशेस आली व त्यामुळे या भूमीची अस्मिता तेथून पुढे वादातीत झाली असे मागल्या प्रकरणात आपण म्हटले आहे. याचवेळी महाराष्ट्र हे नामाभिधानही निश्चित झालेले होते, असे आपल्याला दिसून येते. ज्या ज्ञानेश्वरांच्या ग्रंथामुळे मराठी परिपक्क दशेस आली त्यांनी त्याच ग्रंथात 'आम्ही आपला ग्रंथ महाराष्ट्र मंडळात रचला' असे सांगून या भूमीचे अभिधानही निश्चितपणे सांगितलेले आहे. ज्ञानेश्वर म्हणतात -

ऐसे युगी वरी कळी । आणि महाराष्ट्र मंडळी
श्री गोदावरीच्या कुळी | दक्षिणिली
तेथ महेशान्वय संभृते । श्रीनिवृत्तनाथ
केले ज्ञानदेव गीते । देशीकार लेणे

यावरून स्वतंत्र भाषेप्रमाणेच स्वतंत्र अभिधानही तेराव्या शतकाच्या अखेरीला निश्चित झालेले होते यात शंका नाही.
 या आधी महानुभावपंथीयांनी महाराष्ट्र हे नाव आपल्या ग्रंथात वापरलेले आहे. या भूमीचा अभिमानही त्यांनी वाहिला आहे. पण एकतर त्यांचे ग्रंथ शंभरएक वर्षात त्यांनी गुप्त करून टाकले. त्यामुळे या भूमीच्या अस्मितेच्या पोषणास त्यांचा पुढील शतकात काहीच उपयोग झाला नाही. आणि ज्ञानेश्वरी या ग्रंथामुळे मराठी भाषेला जी प्रौढता आली, प्रगल्भता आली, परिपक्वदशा आली, अमृताते पैजा जिंकण्याचे तिला जे सामर्थ्य आले ते महानुभावांच्या ग्रंथांमुळे येणे, ते गुप्त झाले नसते तरी, शक्य नव्हते. त्यामुळे मराठीजन्य अस्मितेचा प्रारंभ ज्ञानेश्वरीपासूनच झाला असे म्हणावे लागते. इटली या देशाच्या सीमा कोठपर्यंत मानाव्या असा प्रश्न येताच, महाकवी डान्टे याची भाषा जेथपर्यंत बोलली जाते तेथपर्यंत, असे निःसंदेह उत्तर इटलीत दिले जाते. त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या सीमा कोठपर्यंत असा प्रश्न येताच, ज्ञानेश्वरांची भाषा जेथपर्यंत बोलली जाते तेथपर्यंत, असे उत्तर निःसंदेह देता येईल. ते महानुभावांच्या कोणत्याही ग्रंथावरून देता येणार नाही. म्हणून महाराष्ट्र या नावाची मोहोर या भूमीवर ज्ञानेश्वरांनीच केली असे म्हणण्यात फार मोठे औचित्य आहे.
 हे निश्चित झाल्यानंतर आता भाषेचा ज्याप्रमाणे आपण मागोवा घेत मागे मागे गेलो त्याचप्रमाणे 'महाराष्ट्र' या अभिधानाचा मागोवा घेत आपल्याला प्रवास करावयाचा आहे. आणि हे नाव प्रथम या भूमीला केव्हा प्राप्त झाले ते पहावयाचे आहे. त्या प्रवासात प्रथम आपल्याला महानुभावांची भेट होईल हे उघडच आहे.

महानुभाव साहित्यात
 महानुभावांचे महाराष्ट्रावर अगदी अनन्य असे प्रेम होते, भक्ती होती. कर्नाटक, तेलंगण या प्रांतांत न जाता 'महाराष्ट्री वसावे' असा चक्रधरस्वामींचा शिष्यांना नेहमी उपदेश असे. हा प्रदेश सात्त्विक वृत्तींना पोषक आहे, तेथली हवा मुमुक्षूंना