पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४९१
प्रेरणांची मीमांसा
 


धनाजी
 धनाजी जाधव हा असाच मोठा सेनापती होता. औरंगजेब मराठ्यांचे किल्ले घेण्याच्या उद्योगात असताना, मोगलांची रसद तोडणे, त्यांचा खजिना लुटणे, त्यांच्या वाटा रोखणे, त्यांच्या लहान लहान तुकड्या गारद करणे, त्यांना हुलकावीत नेऊन शेकडो कोसांची धावपळ करावयास लावणे, असे गनिमी युद्ध करून त्याने मोगलांना दे माय धरणी ठाय करून टाकले. संताजीच्या मृत्यूनंतर दहा वर्षे पर्यंत धनाजीनेच आपल्या रणकौशल्याने मराठ्यांना जय मिळवून दिला.
 नेमाजी शिंदे, हणमंतराव निंबाळकर या दोन सरदारांनीही या स्वातंत्र्ययुद्धात संताजी- धनाजींच्या खालोखाल पराक्रम केला आहे. नेमाजी शिंदे, खानदेश, वऱ्हाड, माळवा या भागात सतत संचार करून, मोगली लष्करावर हल्ले चढवीत असे. सय्यद हसन अलीखान, शर्जाखान असे सरदार त्याने पाडाव केले आणि १७०४ मध्ये नर्मदा ओलांडून सिरोंजपर्यंत धडक मारली. हणमंतराव निंबाळकर प्रथम मोगलांच्या पदरी होता. १६९२ साली तो मराठ्यांना मिळाला. पण मग त्याने मोठाच पराक्रम केला. त्याचा मोगलांना इतका धाक होता की त्याचा मृत्यू (१७०५) हे मोगलांचे महद्भाग्य होय असे त्या काळचा इतिहासकार भीमसेन सक्सेना याने म्हटले आहे.

वतन लोभ
 मराठ्यांनी असा हा असामान्य पराक्रम केला आणि स्वातंत्र्यसंग्राम जिंकला, याचा गौरव आपण वर केलाच आहे. पण आता याची दुसरी बाजू पाहिली पाहिजे. मराठ्यांनी हा जो पराक्रम केला त्याच्या मागे वतनाचा लोभ ही फार मोठी प्रेरणा होती. शिवछत्रपतींचे वतनाविषयी काय धोरण होते हे मागे सांगितलेच आहे. त्यांनी जुनी वतने फारशी खालसा केली नाहीत. पण नवा वतनदार वर्ग निर्माण होऊ द्यावयाचा नाही, असा कटाक्ष ठेवला होता. आणि त्यांनी केलेले बहुतेक कर्ते पुरुष रोख पगार घेऊनच कार्य करीत असत. स्वधर्मनिष्ठा, राष्ट्रभक्ती हे भाव जागृत करून शिवछत्रपतींनी त्यांना वतनलोभ जिंकावयास शिकविले होते. पण या भावनांचा आदर्श समोरून नाहीसा होताच मराठ्यांच्या ठायींची सुप्त वतनासक्ती उफाळून वर आली. आणि राष्ट्रभक्ती वाऱ्यावर सोडून देऊन अनेक मराठे वतने वाचविण्यासाठी व मिळविण्यासाठी मोगलांना जाऊन मिळाले.
 याविषयी लिहिताना सेतुमाधवराव पगडी म्हणतात, मोगलमराठा संघर्षकाळात देशमुख, देसाई, पाटील, कुळकर्णी इ. वतनदारांनी मोगलांच्या समोर माना वाकवून आपली वतने टिकविली; इतकेच नव्हे तर वतनापायी ते स्वकीयांशी लढलेही. मराठ्यांची सरशी झाली की त्याच्याकडे जाऊन आपल्या वतनाच्या सनदा ते बहाल करून घेत. आणि मोगलांची सरशी झाली की त्यांच्याकडून सनदा घेत. त्यांच्या